अणुऊर्जा विभाग
जागतिक डोके आणि मान कर्करोग दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यशाळेच्या माध्यमातून कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरील निदान आणि तपासणीचे महत्त्व अधोरेखित
Posted On:
27 JUL 2026 7:38PM by PIB Mumbai
मुंबई,27 जुलै 2026
जगभरात डोके आणि मानेचा कर्करोग हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रासमोरचे एक मोठे आव्हान ठरू लागले आहे. या आजाराने ग्रस्त जगभरातील एकूण रुग्णांपैकी तब्बल एक तृतीयांश रुग्ण भारतात आढळतात. ग्लोबोकॅन 2024 (GLOBOCAN 2024) च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी डोके आणि मानेच्या कर्करोगाचे 3.16 लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळतात, तर 1.41 लाख रुग्णांचा मृत्यू होतो. 2050 पर्यंत भारतातील डोके आणि मानेच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यताही यात वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आजाराला प्रतिबंध करणे, सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान करणे आणि योग्य वेळेत उपचार मिळणे ही तातडीची गरज बनली आहे.
या आजाराविषयी जनजागृती करणे, या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या धोकादायक परिस्थितीपासून दूर राहण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे, आजाराची प्रारंभिक लक्षणे ओळखणे तसेच या आजाराने ग्रस्त रुग्णांचा जगण्याचा दर आणि जीवनमान सुधारण्यासाठी वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून देणे या उद्देशाने दरवर्षी 27 जुलै रोजी जागतिक डोके आणि मानेचा कर्करोग दिन म्हणून पाळला जातो.
जागतिक डोके आणि मानेचा कर्करोग दिनाचे औचित्य साधून अणू ऊर्जा विभागाच्या अखत्यारीतील टाटा मेमोरियल सेंटर मधील पेमास्टर शोधिका या कर्करोग विषयक प्रगत उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्राच्या (ACTREC - Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer) सभागृहात 24 जुलै रोजी तोंड, डोके आणि मानाच्या कर्करोगाची तपासणी तसेच मूलभूत वैद्यकीय व्यवस्थापन या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोग विज्ञान केंद्राच्या (CCE - Centre for Cancer Epidemiology) अंमलबजावणीशास्त्र आणि वर्तणूक संशोधन विभागाने (DISBR - Division of Implementation Science and Behavioural Research) महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आखून दिलेल्या आराखड्याला अनुसरून, तोंडाच्या कर्करोगाची तथ्य पुराव्यांवर आधारित तपासणी, सुरुवातीच्या टप्प्यावरील निदान आणि बहुविद्याशाखीय वैद्यकीय व्यवस्थापनाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या मुद्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला.
ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि नवी मुंबईतील 100 पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, दंतचिकित्सक आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत झालेल्या विज्ञाननिष्ठ सत्रांच्या माध्यमातून डोके आणि मानाच्या कर्करोगाची व्याप्ती, तोंडाच्या कर्करोगाच्या तपासणीसंबंधीचे तथ्य - पुरावे, अंमलबजावणी संबंधीची धोरणे आणि प्रात्यक्षिक प्रकल्पांतून मिळालेली शिकवण यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच, तोंडाच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होण्याचे महत्वही अधोरेखित केले गेले. त्याअनुषंगाने असंसर्गजन्य आजारांच्या व्यापक तपासणीत महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीवरही या कार्यशाळेत चर्चा झाली. यासोबतच या कार्यशाळेत बहुविद्याशाखीय उपचार पद्धती आणि तंबाखूमुक्ती संबधी सेवांवर आधारित सत्रे झाली. या सत्रांमधून कर्करोग विषयक सर्वसमावेशक आरोग्यविषयक सेवा सुश्रृषा आणि उपचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290135)
अभ्यागत कक्ष : 30