सांस्कृतिक मंत्रालय
नागपुरात 29 ते 31 जुलै दरम्यान 33 वा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सव
सांस्कृतिक मंत्रालयाच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत आणि संगीत नाटकांचे सादरीकरण
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2026 5:45PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत असलेली स्वायत्त संस्था दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर'तर्फे 29 ते 31जुलै 2026 या कालावधीत डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे 33 व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलाकार, वादक आणि एका गाजलेल्या मराठी संगीत नाटकाचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी 6.30 वाजता कार्यक्रमांना सुरुवात होईल.

24 जुलै 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत उपसंचालक मिथिला तळवणकर आणि सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी यांनी या महोत्सवाची विस्तृत माहिती दिली. यावेळी लेखा व प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात 29 जुलै रोजी पद्मश्री शुभा मुद्गल यांच्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायनाने होईल. त्या भारतातील आघाडीच्या शास्त्रीय गायिका असून, त्या त्यांच्या समृद्ध संगीत वारशासाठी आणि दिग्गज गुरूंच्या मार्गदर्शनात घेतलेल्या सखोल प्रशिक्षणासाठी ओळखल्या जातात. त्यानंतर प्रसिद्ध संगीतकार निलाद्री कुमार यांचे सतार वादन होईल. पारंपरिक सतार वादनाची शैली जपत असतानाच झितार विकसित करून भारतीय शास्त्रीय संगीतात नाविन्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना विशेष ओळख मिळाली आहे.
30 जुलै रोजी प्रेक्षकांना भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबईतर्फे सादर केले जाणारे सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटक 'देवबाभळी' पाहता येईल. प्राजक्त देशमुख यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आणि आनंद ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या या नाटकाचे 800 हून अधिक प्रयोग सादर झाले असून त्याला 44 पुरस्कार मिळालेले आहेत. पारंपरिक अभंग रचना आणि समकालीन नाट्य सादरीकरण यांचा सुरेख संगम साधल्याबद्दल या संगीत नाटकाची विशेष ओळख आहे.
महोत्सवाचा समारोप 31 जुलै रोजी पद्मश्री पंडित रोनू मुजुमदार यांच्या बासरी वादनाने होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त असलेले पंडित रोनू मुजुमदार यांनी जगभरात भारतीय बासरी लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या महोत्सवाची सांगता प्रसिद्ध गायक आणि संगीतकार 'स्वराधीश' डॉ. भरत बलवल्ली यांच्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायन सादरीकरणाने होईल. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा संगीत वारसा जतन आणि संवर्धित करण्याच्या योगदानासाठी ते ओळखले जातात.
या संपूर्ण महोत्सावाच्या प्रवेशिका नागपूर येथील साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर मधून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत मिळवता येतील; तसेच महोत्सवाच्या ठिकाणीही उपलब्ध असतील.
एससीझेडसीसी'च्या संचालिका आस्था कारलेकर यांनी संगीतप्रेमी, कलाप्रेमी आणि नागरिकांना या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
***
माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289415)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English