माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

57 वा 'इफ्फी' 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार आयोजित; प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

 

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), गोवा सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने, 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यात आयोजित होणाऱ्या 57 व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'साठी (आय एफ एफ आय - इफ्फी) प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. अकादमी पुरस्कार (ऑस्कर) नामांकित दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, 57 व्या आवृत्तीचे महोत्सव संचालक  म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

'इंडियन पॅनोरमा', 'भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार', 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) पुरस्कार' आणि 'आंतरराष्ट्रीय सिनेमा' विभागांतर्गत तीन स्पर्धांसाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. इच्छुक अर्जदारांनी पात्रता निकष, अर्ज सादर करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांसाठी 'इफ्फी'च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

'इंडियन पॅनोरमा'मध्ये समकालीन भारतीय चित्रपटांचे उत्कृष्ट प्रदर्शन

1978 मध्ये सुरू झालेला 'इंडियन पॅनोरमा' हा 'इफ्फी'चा एक मुख्य विभाग आहे आणि तो समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपट प्रदर्शित करतो. या 57 व्या आवृत्तीत 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फीचर फिल्म्स दाखवल्या जातील.

'न्यू होरायझन्स'  विभागात असामान्य दर्जा असलेले जास्तीत जास्त पाच अप्रदर्शित भारतीय फीचर चित्रपट सादर केले जातील. याशिवाय, नवोदित दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'भारतीय फीचर फिल्मच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारा'साठी नामांकित झालेले पाच चित्रपट दाखवले जातील. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) पुरस्कार' हा भारतीय डिजिटल मंचावरील उत्कृष्ट कथाकथनाचा गौरव करतो आणि भारतीय भाषांमधील मूळ आशयाला  प्रोत्साहन देतो. या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

'इंडियन पॅनोरमा' आणि 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज (ओटीटी) पुरस्कारा'साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे, तर स्वाक्षरी केलेल्या अर्जांच्या प्रत्यक्ष प्रती आणि आवश्यक कागदपत्रे 17 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करावी लागतील.

'आंतरराष्ट्रीय सिनेमा' विभागांतर्गत जागतिक स्पर्धांसाठी प्रवेशिका सुरू

आंतरराष्ट्रीय सिनेमा विभागात 'मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा', 'सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म दिग्दर्शक स्पर्धा' आणि 'आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक स्पर्धा' यांचा समावेश असेल. या स्पर्धांसाठी एकूण 1.36 कोटी रुपयांचे एकत्रित बक्षीस दिले जाईल.

स्पर्धा विभागांव्यतिरिक्त, या महोत्सवात 'जगभरातील महोत्सवांमधील निवडक चित्रपट', 'मिशन लाईफ' , 'उदयोन्मुख चित्रपट निर्माते', 'पुनरुज्जीवित जुने दर्जेदार चित्रपट' , 'माहितीपट', 'ॲनिमेशन आणि प्रायोगिक चित्रपट' यासारखे विशेष विभाग असतील, ज्यामध्ये जगभरातील प्रशंसाप्राप्त चित्रपट दाखवले जातील.

आंतरराष्ट्रीय सिनेमा विभागासाठी, 'फिल्मफ्रीवे' या व्यासपीठाद्वारे प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 आहे.

'इफ्फी'  बद्दल:

१९५२ मध्ये स्थापन झालेला आणि 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशन' (FIAPF) द्वारे स्पर्धात्मक चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता मिळालेला 'इफ्फी' हा आशियातील सर्वात जुना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव जागतिक स्तरावर सिनेसृष्टीतील उत्कृष्टता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि चित्रपट निर्माते, उद्योग व्यावसायिक व प्रेक्षक यांच्यातील अर्थपूर्ण संवादासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

***

माधुरी पांगे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2289396) आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English