माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सीबीसी नागपूर कार्यालयाच्या वतीने कारगिल विजय दिवस आणि नशा मुक्त भारत अभियानावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2026 1:12PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय संचार ब्युरोच्या (CBC), नागपूर कार्यालयाने आज नागपूर माध्यमिक विद्यालय, काटोल रोड, नागपूर येथे कारगिल विजय दिवस-2026 आणि नशा मुक्त भारत अभियानावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

सेवानिवृत्त कॅप्टन दीपक लिमसे यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कारगिल युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या शूर सैनिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धातील प्रेरणादायी प्रसंगांचे स्मरण करत त्यांनी सशस्त्र दलांचे धैर्य, शिस्त आणि देशभक्ती अधोरेखित केली. तसेच विद्यार्थ्यांना या मूल्यांचा अंगिकार करून देशसेवा करण्याचे आणि सशस्त्र दलात करिअर करण्याचा विचार करण्याचे त्यांनी आवाहन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर दादा जिचकार यांनीही उपस्थितांना संबोधित केले आणि विद्यार्थ्यांना देशभक्तीची मूल्ये जपण्याचे आणि व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे यांनी स्वागतपर भाषण केले. सीबीसीच्या पीआरटी सांस्कृतिक पथकाने देशभक्तीपर नृत्य आणि नशा मुक्त भारत अभियानाचा संदेश देणारे प्रभावी पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत अभियानाची शपथही घेतली आणि एनएमबीए सेल्फी बूथला भेट दिली.
कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून 24 जुलै 2026 रोजी कारगिल विजय दिवस आणि नशा मुक्त भारत अभियान या विषयांवर चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात स्पर्धांमधील विजेत्यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

क्षेत्रीय प्रचार सहाय्यक शुभम गुढधे यांच्या आभार प्रदर्शनाने आणि त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि आमंत्रित पाहुण्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या सर्व उपस्थितांनी देशाच्या वीरांचा सन्मान करण्याच्या आणि नशा मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्याच्या सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***
अंबादास यादव/ शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289326)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English