अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तीकर विभाग, पुणे क्षेत्राद्वारे 167वा प्राप्तीकर दिन साजरा 

प्रविष्टि तिथि: 24 JUL 2026 7:37PM by PIB Mumbai

पुणे, 24 जुलै, 26

प्राप्तीकर  विभाग, पुणे क्षेत्राच्या वतीने आज विमान नगर भागातील क्लोव्हर पार्क इथल्या  सिम्बायोसिस ऑडिटोरियममध्‍ये एका औपचारिक समारंभात 167 वा 'प्राप्तीकर  दिन' (आयकर दिवस) साजरा करण्यात आला. 1860 मध्ये भारतात पहिल्यांदाच प्राप्तीकर  लागू करण्याच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 24 जुलै रोजी 'प्राप्तीकर  दिन' साजरा केला जातो. करदात्यांचा सन्मान करणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे आणि पारदर्शक, तंत्रज्ञान-आधारित तसेच नागरिक-केंद्रित कर प्रशासनाप्रति विभागाची कटिबद्धता अधोरेखित करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि राज्यसभेचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  डॉ. जाधव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे सदस्य आहेत.
आपल्या भाषणात डॉ. जाधव यांनी 167 व्या प्राप्तीकर  दिनानिमित्त प्राप्तीकर  विभागाचे अभिनंदन केले आणि 'डी-डॉलरलायझेशन' म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्थेतील डॉलरचे वर्चस्व कमी होण्याची प्रक्रिया तसेच त्याचे जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयावर विचार मांडले. 1944 मधील ब्रेटन वुड्स परिषद, 1971 चा 'निक्सन शॉक' आणि आजची स्थिती अशा डॉलरच्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी नमूद केले की, जागतिक परकीय चलन साठ्यामध्ये डॉलरचा वाटा 1960 च्या दशकामध्‍ये  जवळपास 90 टक्के होता तो  आज 60 टक्क्यांच्या खाली आला आहे. बहुध्रुवीय भू-राजकीय बदल, सध्याच्या अमेरिकन प्रशासनाकडून व्यापार शुल्काचा शस्त्रासारखा वापर आणि तेल तसेच वस्तूंच्या व्यापारात स्थानिक चलनांचा वाढता वापर ही यामागची प्रमुख कारणे आहेत. भारताच्या संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाची विशाल बाजारपेठ, लोकशाही संस्था आणि कुशल मनुष्यबळ यामुळे या बदलाचा भारताला मोठा लाभ होऊ शकतो. यासाठी त्यांनी रुपयातील व्यापाराला प्रोत्साहन देणे, निर्यात भागीदारीत विविधता आणणे, 'करन्सी स्वॅप लाइन्स' बळकट करणे आणि सीमापार  व्यवहारांसाठी 'डिजिटल रुपया' विकसित करणे यांसारखे उपाय सुचवले. ब्रिक्स  देशांसाठीच्या सामायिक चलनाबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले.  ही कल्पना आकर्षक असली तरी सदस्य देशांच्या भिन्न राजकीय संरचनांमुळे ती अव्यवहार्य असल्याचे सांगून,  त्यांनी 'बास्केट करन्सी' (चलनांचा समूह) पद्धतीचा अवलंब करणे हा अधिक वास्तववादी मार्ग असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुणे येथील प्राप्तीकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त  विवेक वाडेकर  यांनी भूषवले. आपल्या भाषणात,  वाडेकर यांनी 1860  मध्ये प्राप्तीकर  सुरू झाल्यापासून ते गेल्या आर्थिक वर्षात 23 लाख कोटी रुपयांहून अधिक कर संकलनापर्यंतच्या विभागाच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी तंत्रज्ञानावर आधारित बदलांवर प्रकाश टाकला — जसे की मॅन्युअल फाइल्स’कडून एआय -आधारित विश्लेषणापर्यंत तसेच, प्रत्यक्ष छाननीकडून 'फेसलेस' म्हणजेच समोरासमोर न येता होणाऱ्या, चेहरा विरहित मूल्यांकनापर्यंतचा प्रवास  सांगितला. केवळ अंमलबजावणी करण्यापासून ते विश्वासावर आधारित प्रणालीकडे झालेली वाटचाल नमूद  करत वाडेकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी दाखल केलेल्या सुमारे 9 कोटी विवरणपत्रांपैकी  केवळ 1.65  लाख प्रकरणे डिजिटल मूल्यांकनाद्वारे छाननीसाठी निवडली गेली;  यावरून करदात्यांवरील वाढलेला विश्वास आणि  ‘एनयूडीजीई’-‘नज’  मोहिमेसारख्या उपक्रमांचा प्रभाव दिसून येतो. पुणे विभागाने 1.33 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले असून, राष्ट्रीय स्तरावर या विभागाचा सहावा क्रमांक लागला आहे, असेही त्यांनी सांगितले.  प्रत्येक डिजिटल सुधारणा आणि महसुलाच्या महत्त्वाच्या टप्प्यामागे एक माणूस असतो — प्राप्तीकर  कुटुंबातील सदस्य जे निष्ठेने काम करतात आणि प्रत्येक बदलाला सार्थकता देतात यावर वाडेकर यांनी  भर दिला.   त्यांनी नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत विभागातील प्रत्येक सदस्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला पुणे येथील प्राप्तीकर  विभागाचे महासंचालक (अन्वेषण)  जगजीवन के. गर्ग  यांच्यासह पुणे विभागातील इतर प्रधान आयुक्त, आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन आणि गणेश वंदना  करून झाली, त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राप्तीकर  विभागावरील एक लघुपट आणि पुणे विभागाच्या कार्याचा आढावा घेणारे सादरीकरण दाखवण्यात आले. पुणे विभागातील सर्वोच्च करदात्यांनी नियमांचे केलेले उत्कृष्ट पालन आणि जबाबदारीने कर भरून राष्ट्रनिर्माणात दिलेले योगदान लक्षात घेऊन, त्यांना प्रधान मुख्य आयुक्त (पुणे) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील विविध गुणांना वाव देण्यासाठी, प्राप्तीकर  दिनाच्या निमित्ताने विभागाने क्रीडा, कला आणि साहित्य या क्षेत्रांत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, छायाचित्रण, एकल गायन, चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजूषा, निबंध लेखन, वादविवाद आणि साहित्य निर्मिती या क्षेत्रांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यातून विभागाविषयी  विश्वास अधोरेखित झाला की, येथील कर्मचारी केवळ समर्पित कर प्रशासकच नाहीत, तर व्यावसायिक कर्तव्यांच्या पलीकडे जाऊन  कलागुण त्यांच्यामध्‍ये आहेत. या कार्यक्रमाची सांगता पुणे येथील 'गंधर्व महाविद्यालया'ने सादर केलेल्या 'आशा: ॲन इन्स्ट्रुमेंटल ट्रिब्यूट' या वाद्य-संगीत कार्यक्रमाद्वारे झाली.
भारताच्या वित्तीय इतिहासात 'प्राप्तीकर  दिना'ला विशेष महत्त्व आहे. प्राप्तीकर  दिनाचा हा वार्षिक उत्सव प्रामाणिक करदात्यांबद्दल विभागाची कृतज्ञता व्यक्त करतो; तसेच स्वेच्छेने कर नियमांचे पालन, पारदर्शकता आणि सुशासनाची संस्कृती रुजवण्याबाबतची विभागाची दृढ कटिबद्धता अधोरेखित करतो.
कार्यक्रमामध्‍ये स्वागतपर भाषण प्राप्तीकर  आयुक्त मनीष कुमार सिंग यांनी केले. तसेच, पुणे  अतिरिक्त आयकर आयुक्त (मुख्यालय) (प्रशासन) शशांक देवगडकर  यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

***

सुषमा काणे /सुवर्णा बेडेकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2289234) आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English