अर्थ मंत्रालय
आयकर विभाग, मुंबईने साजरा केला मुंबईत 167 वा आयकर दिन
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या नेतृत्वात 167 व्या आयकर दिन सोहळ्याचे आयोजन; अभिनेता विकी कौशल यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती
करदात्यांना अतिशय सहजपणे सेवा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित आणि करदाता-केंद्री संघटनेत आयकर विभागाचे रूपांतर होत आहे.' — आलोक कुमार, मुख्य प्रधान आयकर आयुक्त, मुंबई
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 6:35PM by PIB Mumbai
आयकर विभाग, मुंबईने आज कौटिल्य भवन, वांद्रे-कुर्ला संकुल , मुंबई येथे 167 वा आयकर दिन साजरा केला. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून तर प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होते.

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राष्ट्रउभारणीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आयकर विभागाचे अभिनंदन केले आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी संसाधने उभारण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. तंत्रज्ञानाचा वापर करणे, करदाता सेवा सुधारणे आणि देशाचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी विभागाकडून होणाऱ्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

यावेळी बोलताना, मुंबईचे मुख्य प्रधान आयकर आयुक्त, आलोक कुमार यांनी आयकर विभागाचे आधुनिक, तंत्रज्ञान-आधारित आणि करदाता-केंद्री संघटनेत होत असलेल्या रूपांतरावर भर दिला. प्री-फिल्ड आयकर विवरणपत्र, एआय आणि मशीन लर्निंग-आधारित जोखीम मूल्यांकन, फेसलेस सेवा तसेच विवरणपत्र दाखल करण्याची आणि परताव्याची जलद प्रक्रिया यांसारख्या डिजिटल उपक्रमांद्वारे करदात्यांना विनाअडथळा सेवा प्रदान करण्यावर विभागाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांची निर्मिती, राष्ट्रीय सुरक्षा आणि समाजकल्याणकारी कार्यक्रमांना पाठबळ देऊन प्रत्यक्ष कर हे भारताच्या विकासाचा कणा म्हणून समोर आले आहेत, असे ते म्हणाले. "ज्याप्रमाणे मधमाशी फुलाला इजा न पोहोचवता त्यातून मध गोळा करते, त्याचप्रमाणे महसूल गोळा केला पाहिजे" या कौटिल्य यांच्या तत्त्वाचा उल्लेख करत, आलोक कुमार यांनी "पारदर्शक करप्रणाली: प्रामाणिकांचा सन्मान" या तत्त्वज्ञानाप्रति आणि ऐच्छिक करपालनाला प्रोत्साहन देताना करदात्यांसोबत अधिक विश्वास निर्माण करण्याच्या विभागाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

विकी कौशल यांनी विभागाच्या नागरिक-केंद्री दृष्टिकोनाचे कौतुक केले. राष्ट्रउभारणीत ॲडव्हान्स टॅक्सचे महत्त्व समजल्यानंतर, आपला ॲडव्हान्स टॅक्स भरताना राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपण थेट योगदान देत आहोत हे जाणून अधिक समाधान वाटल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, करदाते, माध्यम प्रतिनिधी तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सोहळ्याने 2047 पर्यंत 'विकसित भारत'च्या ध्येयात योगदान देताना करदात्यांची सचोटी, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेने सेवा करण्याच्या आयकर विभागाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***
सोनाली काकडे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289146)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English