नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नाविकांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे प्रत्यक्ष जहाजावरील संरचित ऑनबोर्ड प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात

Posted On: 24 JUL 2026 5:56PM by PIB Mumbai

 

मुंबई 24 जुलै 2026

देशाचे सागरी कार्यबळ अधिक सक्षम करण्याच्या आणि समुद्रात जाण्याआधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मात्र जहाजावरील प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसमोरील समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने  जनरल पर्पज (जीपी) रेटिंग तसेच सागरी केटरिंग प्रशिक्षणार्थींसाठीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमसी) यांसाठी सहा महिने कालावधीचा, प्रत्यक्ष जहाजावरील संरचित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू  केला आहे. अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या मालकीच्या आणि भारतीय नौवहन महामंडळातर्फे  व्यवस्थापित  एमव्ही स्वराज दीप या जहाजावर सदर प्रशिक्षण घेण्यात येत आहे. दिनांक 15 जुलै 2026 रोजी या प्रशिक्षणाची सुरुवात झाली.

मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सागरी प्रशासन महासंचालनालयाच्या सहयोगाने भारतीय नौवहन महामंडळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला सागरी प्रशिक्षण ट्रस्टचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने याचे नियोजन, अंमलबजावणी, प्रशासन तसेच देखरेख या सर्व कार्यांची जबाबदारी महामंडळावर सोपवण्यात आलेली आहे.

पात्र जीपी रेटिंग तसेच सीसीएमसी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष जहाजावरील संरचित प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन समुद्र-पूर्व प्रशिक्षण आणि नोकऱ्या यामधील लक्षणीय दरी भरून काढण्याचा प्रयत्न करुन, होतकरु भारतीय नाविकांची रोजगारक्षमता लक्षणीय प्रमाणात वाढवण्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील आहे. हा उपक्रम देशातील आणि जागतिक अशा दोन्हीकडील नौवहन उद्योगांमध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करतानाच भारतातील कुशल सागरी व्यावसायिकांचा समूह मजबूत करेल. हे प्रशिक्षण सागरी भारत संकल्पना 2030 च्या उद्दिष्टांशी अनुरूप  अशा पद्धतीने आखण्यात आले आहे.

भारतातील तरुणांसाठी शाश्वत रोजगार संधी निर्माण करण्यासाठी आणि भविष्यासाठी सज्ज, जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकेल असे सागरी कार्यबळ उभारण्यासाठी सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांसोबत एकत्र येऊन काम करण्याप्रती केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय सदैव कटिबद्ध आहे.

***

सोनाली काकडे/संजना चिटणीस/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2289117) अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein: English