संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कारवार येथे 'आयएनएस मालवण' या स्वदेशी युद्धनौकेचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश


माहे-श्रेणीतील उथळ पाण्यातील अद्ययावत पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या समावेशामुळे भारताची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता झाली अधिक बळकट

प्रविष्टि तिथि: 22 JUL 2026 5:10PM by PIB Mumbai

गोवा, 22 जुलै 2026

 

'माहे' क्षेणीतील पाणबुडी-प्रतिकारक युद्धक्षमता असलेली, उथळ पाण्यात वापरण्यासाठी (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) डिझाईन आणि बांधणी करण्यात आलेली 'आयएनएस मालवण' ही  दुसरी स्वदेशी युद्धनौका बुधवारी कारवार येथे भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करून घेण्यात आली. यामुळे 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत भारताच्या वाढत्या स्वदेशी नौदल सामर्थ्याच्या वाटचालीतील हा आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे.

हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात ही नौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सागरी व्यापार सुरळितपणे सुरू राहील हे सुनिश्चित करण्यासाठी सागरी दळणवळण मार्गांच्या सुरक्षेचे महत्त्व विशद केले; तसेच, जागतिक पातळीवरील वाढत्या अनिश्चिततेच्या वातावरणात भारताच्या आर्थिक विकासासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.या युद्धनौकेचा 80 टक्क्यांहून अधिक भाग स्वदेशी असल्याचे अधोरेखित करत त्यांनी स्वदेशीकरणाच्या दिशेने  झालेल्या भारतीय नौदलाच्या  प्रगतीची प्रशंसा केली.

जहाजबांधणी प्रक्रियेत आपल्या अधिकाऱ्यांचा थेट सहभाग सुनिश्चित करण्याच्या नौदलातील पद्धतीचे हवाई दल प्रमुखांनी कौतुक केले; हा दृष्टिकोन संपूर्ण संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला गती देण्याच्या दृष्टीने आदर्श ठरू शकेल, असे त्यांनी नमूद केले. सैन्य दलांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करण्यावर भर देत, भविष्यातील सुरक्षा विषयक आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भूदल, नौदल आणि हवाई दल यांचे निर्वेधपणे एकत्रीकरण करण्याच्या संकल्पनेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

या कार्यक्रमास वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल संजय वत्सायन यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी सैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

'आयएनएस मालवण'ला भारतीय नौदलाच्या 'इनशोर माइनस्वीपर' (किनारालगतच्या क्षेत्रातील सुरुंग शोधून नष्ट करणारी नौका) या तिच्या पूर्वसुरीचा वारसा लाभला आहे. 2003 मध्ये सेवेतून निवृत्त होण्यापूर्वीची 19 वर्षे तिने देशासाठी उत्कृष्ट सेवा बजावली होती.

या जहाजाच्या बोधचिन्हावर शौर्य, चपळता, धाडस आणि व्यूहरचनात्मक युद्धकौशल्याचे प्रतीक असलेली 'वाघ नखे' कोरलेली आहेत. भारताच्या अफाट सागरी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लाटांनी वेढलेले हे बोधचिन्ह, देशाच्या सागरी सीमा आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्याप्रती भारतीय नौदलाची अढळ कटिबद्धता दर्शवणारे आहे. "सायलेंट क्लॉज" असे या जहाजाचे ब्रीदवाक्य असून, ते गुप्तता, अचूकता आणि आवश्यकतेनुसार त्वरित प्रहार करण्याची क्षमता दर्शवते.

एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी हा प्रकल्प म्हणजे भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. 'आयएनएस मालवण'च्या समावेशामुळे भारतीय नौदलाची पाणबुडी-विरोधी युद्धक्षमता आणखी बळकट झाली आहे. मोठ्या आकाराच्या युद्धनौका, पाणबुड्या आणि हवाई साधनसामग्री यांच्याबरोबरीने प्रभावीपणे काम करण्यासाठी डिझाइन केलेली ही युद्धनौका, नौदलाची कार्यान्वयन सज्जता वाढवणारी आहे; तसेच सर्व सागरी क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करून देशाच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याची क्षमताही बळकट करणारी आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2287915) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English