आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रुग्णांच्या कुटुंबासाठी 800 खाटांच्या विश्रामगृहासाठी एम्स नागपूरचा सामंजस्य करार
Posted On:
22 JUL 2026 4:31PM by PIB Mumbai
नागपूर, 22 जुलै 2026
संवेदनशील आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, एम्स नागपूरने आपल्या परिसरात 800 खाटांचे विश्रामगृह उभारण्यासाठी 'सेवादान आरोग्य फाउंडेशन' सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा उद्देश संस्थेत उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक आणि सोबत असणाऱ्या व्यक्तींना किफायतशीर, सुरक्षित आणि सन्मानजनक निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे.

या प्रस्तावित विश्रामगृहात, माफक दरात स्वच्छ व आरामदायक निवास, स्वच्छता नियम पाळून तयार केलेले भोजन आणि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध असतील. या उपक्रमामुळे एम्स नागपूर येथे विशेष वैद्यकीय उपचारांसाठी महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधून येणाऱ्या कुटुंबांवरील आर्थिक व प्रवासाशी संबंधित ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
हे विश्रामगृह रुग्णांसाठी आणि त्यांच्या काळजीवाहूंसाठी आश्वासक वातावरण निर्माण करून वैद्यकीय सेवांच्या पलीकडे आरोग्यसेवा विस्तारण्याच्या एम्स नागपूरच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे. रुग्णाची काळजी घेणाऱ्यांना परिसरात सुरक्षित आणि किफायतशीर राहण्याची सोय उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करून, रुग्णाच्या उपचारादरम्यान अधिक सोय, सन्मान आणि मानसिक शांती प्रदान करण्याचा संस्थेचा हेतू आहे.
उर्वरित वैधानिक आणि प्रशासकीय औपचारिकता पूर्ण झाल्यावर विश्रामगृहाचे बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा असून यामुळे एम्स नागपूर येथील रुग्ण-सहाय्यक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाईल.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने एम्स नागपूरला रासायनिक, जैविक, किरणोत्सारी, आण्विक आणि स्फोटक (CBRNE) आपत्कालीन परिस्थितीच्या द्वितीयक वैद्यकीय व्यवस्थापनासाठी केंद्र म्हणून निश्चित केले आहे. ही मान्यता आपत्ती सज्जता, आपत्कालीन प्रतिसाद आणि गुंतागुंतीच्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीच्या व्यवस्थापनातील संस्थेची वाढती क्षमता अधोरेखित करते. यातून राष्ट्रीय आरोग्यसेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद चौकटीत तिची भूमिका अधिक प्रभावी होते.

आपल्या प्रगत निदान आणि संशोधन क्षमता अधिक सक्षम करण्याच्या दिशेने, एम्स नागपूरने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रासोबत (एनसीडीसी) जैवसुरक्षा पातळी -III (बीएसएल -III) प्रयोगशाळा उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. प्रस्तावित असलेली ही अत्याधुनिक सुविधा, उच्च-जोखीम असलेल्या संसर्गजन्य रोगांचे प्रगत निदान, संनिरीक्षण आणि संशोधन करण्याबाबत संस्थेची क्षमता लक्षणीयरीत्या वृद्धिंगत करेल. तसेच यामुळे नवीन आणि पुन्हा उद्भवू शकणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा सामना करण्याची सज्जता वाढण्यासोबतच, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसाद क्षमताही अधिक बळकट होईल.
हे महत्त्वपूर्ण उपक्रम- 800 खाटांचे विश्रामगृह, बीएसएल -III प्रयोगशाळा आणि सीबीआरएनई द्वितीयक वैद्यकीय व्यवस्थापन केंद्र म्हणून मिळालेली मान्यता, यातून रुग्ण देखभाल सुविधा अधिक उत्तम करणे, निदान व संशोधनासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अधिक सक्षम करणे यांप्रति संस्थेची दृढ वचनबद्धता अधोरेखित होते.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सोनाली कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2287876)
अभ्यागत कक्ष : 44