कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसदेतील प्रश्न : महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात वाढ


ऊस उत्पादनात 2024-25 मधील 1,099.70 लाख टनांवरून 2025-26 मध्ये 1,316.49 लाख टनांपर्यंत वाढ

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 जुलै 2026

महाराष्ट्रातील ऊस उत्पादन 2024-25 मधील 1,099.70 लाख टनांवरून वाढून 2025-26 मध्ये 1,316.49 लाख टनांपर्यंत (तिसरा आगाऊ अंदाज ) पोहोचले आहे.

कृषी आणि कृषक कल्याण विभाग आपल्या नागपूर आणि नाशिक इथल्या क्षेत्रीय आणि केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रांच्या माध्यमातून नियमितपणे किडींचे संनिरीक्षण करतो, आणि शेतकरी शेतीशाळा, हंगाम प्रदीर्घ प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्बोधन, अशा विविध माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबतच्या माहितीचा प्रसार करत असतो. 

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या सर्वेक्षणात  2024-2025 या वर्षात 4295 हेक्टरपैकी केवळ 34 हेक्टर क्षेत्रावर  उसावर लाल कूज किंवा उसी गाभा रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे  2025-2026 मध्ये सर्वेक्षण केलेल्या 1450 हेक्टरपैकी केवळ 5 हेक्टरवरील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. त्यानुसार शेतकऱ्यांसाठी सल्ला जारी करण्यात आला. 

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून उसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादकतेचा पद्धतशीरपणे अंदाज घेतला जातो. साखरेचा उतारा, हा प्रामुख्याने पिकाचे विशिष्ट वाण, जमिनीची स्थिती, हवामान निकष आणि इतर अनेक प्रादेशिक कृषी-हवामानविषयक घटकांवर अवलंबून असतो. नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात, संपूर्ण महाराष्ट्रात साखरेचा सरासरी उतारा 11.26% इतका नोंदवला गेला. चालू साखर हंगामात राज्यात एकूण 210 साखर कारखाने (सहकारी आणि खाजगी दोन्ही) कार्यरत होते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामाचा विचार करता, देयके अदा करण्याच्या नियामक यंत्रणेची अंमलबजावणी अत्यंत प्रभावी ठरली आहे; चालू साखर हंगामात उत्पादकांना 'रास्त आणि लाभदायक किंमत' (एफआरपी) अंतर्गत देय असलेल्या रकमेपैकी सुमारे 99.6% रक्कम यशस्वीपणे वितरित करण्यात आली आहे.

दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी राज्य सरकार साखर कारखान्यांना सातत्याने महसुलाचे वैविध्यपूर्ण स्रोत निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यामध्ये राष्ट्रीय इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत (ईबीपी)  वीज सह उत्पादन प्रकल्प आणि इथेनॉल ऊर्ध्वपातन युनिट्सची स्थापना व तांत्रिक उन्नयन यांचा समावेश आहे. यामुळे कारखान्यांना इष्टतम रोख ओघ राखता येतो.  साखरेच्या बाजारभावातील चढ-उतारावर त्यांचे अवलंबित्व कमी होते. 

याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने 10.25% साखर उतारा दराच्या आधारावर, आगामी 2026–27 या साखर हंगामासाठी उसाची एफआरपी 365 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे.  चालू 2025–26 या हंगामात ती  355 रुपये प्रति क्विंटल आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने 2014-25 या कालावधीत दुष्काळात टिकणारी एकूण 341 वाणे आणली आहेत, त्यापैकी 36 उसाची आहेत. 

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र 2014-15 पासून केंद्र-पुरस्कृत योजना 'राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान (एनएफएनएसएम) – व्यापारी पिके: ऊस विकास कार्यक्रम' राबवत आहे.  या अंतर्गत, शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षणाद्वारे तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर देण्यात आला आहे.

या कार्यक्रमांतर्गत खालील बाबींची अंमलबजावणी केली जात आहे: (ए) उसासोबत आंतरपीक घेणे आणि सिंगल बड चिप तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, (बी) ब्रीडर सीड (मूळ बियाणे) उत्पादनासाठी सहाय्य, (सी) उती संवर्धन (टिश्यू कल्चर) रोपे, (डी) 2 दिवसांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण, (ई) पीक संरक्षण साधने आणि जैविक घटकांचे, बायो एजंटचे वाटप; (एफ) खोडवा आणि पाचट व्यवस्थापन तसेच सुपरकेन रोपवाटिकेबाबतचे स्थानिक उपक्रम.

2026-27 या वर्षात एनएफएसएनएम - ऊस अंतर्गत उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला 415.02 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग हा ऊस आणि जैविक नियंत्रण  यांवरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पांद्वारे रोग व कीड-प्रतिरोधक ऊस वाणांचे प्रजनन, उसावरील रोगांचे निरीक्षण आणि ऊस उत्पादनाबाबत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवतो.

महाराष्ट्रातील ऊस लागवड क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता यांचा तपशील

क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये), उत्पादन (लाख टनांमध्ये) आणि उत्पादकता (किलो/हेक्टरमध्ये)

क्षेत्र

उत्पादन

 

उत्पादकता

2024-25

2025-26

2024- 25

2025-26

2024-25

2025-26

11.67

13.72

1,099.70

1,316.49

94,230

95,963

 

 

 

 

 

 

#2025-26 ची आकडेवारी ही तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार आहे.

कृषी आणि कृषक कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज लोकसभेत ही माहिती एका लेखी उत्तरात सादर केली.

माधुरी पांगे/सोनाली काकडे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287396) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English