अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

67 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाड 2026 मध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी; 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 जुलै 2026

चीन मध्ये शांघाय येथे आयोजित 67 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाड (आयएमओ) 2026 मध्ये, 6 स्पर्धकांच्या भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत सहभागी 117 देशांमध्ये भारताने (अनौपचारिक) 7 वा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत सुमारे 666 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. 1959 मध्ये सुरू झालेल्या या ऑलिंपियाडच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे.

2019 पासून भारताने (कोरोना महासाथीमुळे सहभागी न होता आलेल्या 2020 चा अपवाद वगळता) प्रत्येक आयएमओमध्ये किमान एक सुवर्णपदक नक्की मिळवले आहे. 1989 मधील पदार्पणापासून भारताने जिंकलेल्या एकूण 25 सुवर्णपदकांपैकी 14 सुवर्णपदके ही गेल्या सात ऑलिंपियाडमध्येच मिळाली आहेत.

संघीय क्रमवारीचा विचार करता, भारताने आयएमओमध्ये 7 वा क्रमांक पटकावण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 1998, 2001 आणि 2025 मध्ये भारताने 7 वा क्रमांक मिळवला होता. 2024 मधील 65 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये मिळवलेला 4 था क्रमांक ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. भारताने आयएमओच्या अंतिम गुणतालिकेत आघाडीच्या 10 देशांमध्ये स्थान मिळवण्याची ही सलग चौथी वेळ आहे. 1989 मधील पदार्पणापासून भारताने 36 सहभागांपैकी आठ वेळा सर्वोच्च-10 मध्ये स्थान मिळवले आहे (2020 चा अपवाद वगळता). आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये भारताने आतापर्यंत एकूण 25 सुवर्ण, 80 रौप्य आणि 80  कांस्य पदकांसह 29 सन्माननीय उल्लेखांची (ऑनरेबल मेन्शन्स) कमाई केली आहे.

पदक विजेते भारतीय विद्यार्थी:

१. श्री. आरव गुप्ता (दिल्ली) — सुवर्णपदक

२. श्री. एबल जॉर्ज मॅथ्यू (कर्नाटक) — सुवर्णपदक

३. श्री. भैरव मुरुगन (कर्नाटक) — रौप्यपदक

४. श्री. कणव तलवार (दिल्ली) — रौप्यपदक

५. कु. संजना फिलो चाको (केरळ) — रौप्यपदक

६. कु. श्रेया शंतनू मुंदडा (मुंबई) — रौप्यपदक

भारतीय संघासोबत मॅथलोट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनंत मुदगल (संघ प्रमुख); एचबीसीएसई, मुंबईचे डॉ. मैनाक घोष (उपप्रमुख); सीएमआय, चेन्नईचे बी.एससी.चे विद्यार्थी  सिद्धार्थ चोप्पारा (निरीक्षक 'अ') आणि एमआयटी, अमेरिकाचे बी.एस.चे विद्यार्थी आदित्य मांगुडी (निरीक्षक 'ब') उपस्थित होते.

अनंत मुदगल, सिद्धार्थ चोप्पारा आणि आदित्य मांगुडी हे माजी आयएमओ पदक विजेते आहेत. या तिघांनी मिळून स्पर्धक म्हणून भारतासाठी 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एचबीसीएसई) सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच आयएमओटीसी 2026 चे आयोजन केल्याबद्दल चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे, तर गणितीय ऑलिंपियाड कार्यक्रमास सुरुवातीपासून पाठबळ दिल्याबद्दल एनबीएचएम (डीएई) आणि शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

 


निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2287392) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English