माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीने आयोजित वार्तालाप - माध्यम परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूरमधील पत्रकारांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी आणि लाभार्थ्यांशी साधला संवाद


'प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत' संकल्पनेवर चर्चासत्र

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2026 5:26PM by PIB Mumbai

 

कोल्हापूर/मुंबई : 21 जुलै 2026

पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हातल्या पत्रकारांसाठी वार्तालाप - माध्यम परिषद, या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 'प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत' ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 44 पत्रकार सहभागी झाले होते. या परिषदेत सहभागी झालेल्या निमंत्रित पत्रकारांना कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी महाराष्ट्राभरातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने पत्रकारांनी परिषदेसाठी उपस्थित असलेल्या योजनेच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले.

या परिषदेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅस्मिन यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रविण टाके, जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे सिनियर डायरेक्टर मिथिलेश पांडे, कौन्सिल ऑफ लेदर एक्सपोर्टचे रिजनल डायरेक्टर संतोष पांडे, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक  अंकित पाटील, कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. पत्रसूचना कार्यालयाच्या  सहाय्यक संचालक, भारती कृष्णन यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचा उद्देश मांडला. 

डॉ. जॅस्मिन यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या भागाचा विकास आणि जिल्ह्याची ओळख निर्माण करताना पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोल्हापूरची संस्कृती, सभ्यता. खानपान, क्रीडा, दागिने या सर्व क्षेत्रात ओळख आहे. मात्र ही ओळख स्थानिक क्षेत्रापर्यंत सीमित आहे. ही ओळख देशपातळीवर, जागतिक पातळीवर नेण्यासाठी उत्तम कार्य करू शकतात. स्थानिक पत्रकारांना गावखेड्यातील अनेक बारकावे माहित असतात. त्यांचे अनुभव आणि स्थानिक भागातील वस्तुस्थिती कोल्हापूरची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी मदत करू शकेल.

आजच्या डिजिटल युगात ज्याच्या हातात मोबाईल तो पत्रकार अशी स्थिती आहे. मात्र जो व्यवस्थित तथ्य पडताळणी करून अचूक आणि विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचवतो तोच खरा पत्रकार, असेही त्या म्हणाल्या.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रविण टाके यांनी परिषदेला संबोधित केले. त्यांनी बदलत्या पत्रकारितेबद्दल मत मांडले. आज पत्रकारांना डिजिटल माध्यमांचे त्याच्या नवनव्या टूल्स शिकण्याची आणि आपल्या दैनंदिन कार्यात आत्मसात करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

कोल्हापुरातील अनेक गोष्टींची ओळख आधीपासूनच आहे मात्र या ओळखींना एक ब्रँड बनवून ते जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई च्या वतीने आयोजित कार्यशाळा उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले. 

परिषदेची सुरुवात जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट कौन्सिल चे संचालक मिथिलेश पांडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील दागिन्यांच्या व्यावसायिकांना झालेल्या लाभाबाबत माहिती दिली. 

कौन्सिल तर्फे दागिन्यांच्या कारागिरांना आरोग्य विमा सुरक्षा, त्यांना दुबई येथील संस्थेद्वारे विशेष प्रशिक्षण, व्यावसायिकांना उत्पादन पोहोचवण्यासाठी दिली जाणारी 65 टक्के सुट या सर्वांबाबत सविस्तर माहिती दिली. हुपरीच्या चांदीला जीआय टॅग मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट चे रिजनल डायरेक्टर संतोष पांडे यांनी कोल्हापुरी चप्पलांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी योजनांद्वारे करत असलेल्या मदतीबद्दल माहिती दिली. स्थानिक उत्पादकांना निर्यात प्रक्रिया, गुणवत्ता मानके आणि परदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एखाद्या उत्पादनाला जीआय टॅग मिळाल्यानंतर तेथील उत्पादकांची जबाबदारी आणखी वाढते, त्यांना गुणवत्तेसोबतच पॅकेजिंग, मार्केटिंग या सर्व गोष्टी सुद्धा त्या दर्जाच्या व्हाव्यात याकडे लक्ष देण्याबाबत त्यांनी अधोरेखित केले.

तिसऱ्या सत्राला राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण (साई) मुंबई चे सहायक संचालक अंकित पाटील यांनी साई ची भूमिका आणि खेळाडूंकरिता सुरू असलेले कार्य याबाबत अवगत केले. कोल्हापुरातील साई केंद्रामध्ये खेळाडूंना दिले जाणारे सर्वतोपरी प्रशिक्षण याची माहिती दिली. स्थानिक भागातील प्रतिभावंतांचा शोध घेण्यापासून ते त्यांना चॅम्पियन बनवण्यापर्यंत सर्व सुविधा राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण प्रदान करत असल्याचे अंकित पाटील यांनी सांगितले.

जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट कौन्सिल, कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट आणि राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण या तीनही सत्रांमध्ये लाभार्थ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

पीआयबीच्या माध्यम व संपर्क अधिकारी नितीन फुल्लुके यांनी पत्र सूचना कार्यालयाचे कार्य व सेवा यांची ओळख सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितली. या सत्रात पत्रकारांच्या वार्तांकनामधील पीआयबीची भूमिका विशद करण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीआयबी मुंबईच्या युवा पेशेवर नेहा कुलकर्णी यांनी केले.

 

 

पीआयबी मुंबई|नितीन फुल्लुके /नेहा कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2287214) आगंतुक पटल : 106
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English