वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमरावतीतल्या पीएम मित्रा पार्क इथे भारतातला पहिला 120 टीपीए कार्बन फायबर तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्प स्थापन करण्यासाठी बीटीआरए आणि एमआयडीसी दरम्यान सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2026 7:23PM by PIB Mumbai

मुंबई,17 जुलै 2026

भारतातल्या प्रगत साहित्य आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, 'द बॉम्बे टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन' (बीटीआरए) आणि 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ' (एमआयडीसी) यांनी अमरावती इथल्या पीएम मित्रा पार्क इथे भारतातला पहिला 120 टीपीए कार्बन फायबर तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्प स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

बीटीआरएचे अध्यक्ष डॉ. शरद कुमार सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (उद्योग, गुंतवणूक आणि सेवा) डॉ. पी. अनबलगन आणि बीटीआरएचे संचालक डॉ. टी. व्ही. श्रीकुमार यांच्यात या सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.

या प्रकल्पाद्वारे 'कार्बन फायबर तंत्रज्ञान विकासासाठी राष्ट्रीय केंद्र' उभारले जाईल. या केंद्रामध्ये कार्बन फायबर तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रकल्प, प्रगत संशोधन आणि विकास केंद्र, आधुनिक चाचणी आणि वैशिष्ट्ये संशोधन प्रयोगशाळा, तंत्रज्ञान पडताळणी आणि प्रमाण वाढवणारी सुविधा, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्र, तसेच उद्योग सहाय्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे व्यासपीठ समाविष्ट असेल.

ही सुविधा प्रायोगिक स्तरावरचे उत्पादन, उत्पादन विकास, प्रक्रिया पडताळणी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाला पाठबळ देऊन, प्रयोगशाळेतले संशोधन आणि व्यावसायिक उत्पादन यांमधले अंतर भरून काढायला मदत करेल. यातून भारतीय उद्योगांद्वारे स्वदेशी कार्बन फायबर तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे.

कार्बन फायबर हा विमानन, संरक्षण, वाहन उद्योग, अक्षय ऊर्जा, रेल्वे, पायाभूत सुविधा, हायड्रोजन साठवण आणि क्रीडा साहित्य अशा विविध क्षेत्रांत वापरला जाणारा महत्त्वाचा प्रगत पदार्थ आहे. या प्रकल्पामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, देशांतर्गत उत्पादनाला बळ मिळेल, परकीय चलनाची बचत होईल आणि देशाच्या सामरिक क्षमताही वृद्धिंगत होतील.

हा उपक्रम संशोधन, नवोन्मेष, उद्योग-शैक्षणिक सहकार्य यांना प्रोत्साहन देईल, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना पाठिंबा देईल आणि प्रगत संमिश्र क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करायला मदत करेल, असे डॉ. टी. व्ही. श्रीकुमार यावेळी म्हणाले.

हा उपक्रम, भारत सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत', 'मेक इन इंडिया' आणि 'पीएम मित्रा' योजनेच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. यामुळे प्रगत उत्पादन, संशोधन आणि नवोन्मेष यासाठी एक अग्रेसर केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल, तसेच यातून वस्त्रोद्योग आणि तांत्रिक वस्त्रोद्योगातले संशोधन, चाचणी, सल्लागार आणि तंत्रज्ञान विकासात बीटीआरएचे दीर्घकालीन योगदान अधोरेखित होते.

राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2286783) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English