शिक्षण मंत्रालय
आयआयटी गोवाचा 7 वा दीक्षांत समारंभ
188 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान; संस्थेचा प्लेसमेंट दर 92.25%
Posted On:
20 JUL 2026 4:20PM by PIB Mumbai
पणजी,20 जुलै 2026
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोव्याचा 7 वा दीक्षांत समारंभ रविवारी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे झाला. या समारंभात बी.टेक., एम.टेक. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांच्या एकूण 188 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आयआयटी गोवाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे अध्यक्ष श्री. आदिल जैनुलभाई होते, तर भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मिथुन पी. (बी.टेक. सीएसई) यांना प्रतिष्ठेचे राष्ट्रपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले, तर देवल ज्ञानेश्वर गावस (एम.टेक. ईई) यांना संस्थेचे सुवर्णपदक देण्यात आले. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चा पुरस्कार त्यांच्या एकूण कामगिरीसाठी अथर्व सचिन केणी (बी.टेक. सीएसई) यांना प्रदान करण्यात आला. डॉ. रुबल (पीएच.डी. एमई) यांना सर्वोत्कृष्ट डॉक्टरेट शोधप्रबंध पुरस्कार (अभियांत्रिकी) मिळाला.

यावेळी जैनुलभाई यांनी उपस्थित पदवीधरांना केवळ नोकरी शोधण्याच्या पारंपरिक मानसिकतेच्या पलीकडे जाऊन संधी निर्माण करणारे आणि राष्ट्रनिर्माते बनण्याचे आवाहन केले. उद्योजकता, नावीन्य आणि निरंतर शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की, नव्याने निर्माण होत असलेल्या आव्हानांवर स्वदेशी उपाय शोधण्यास सक्षम असलेल्या तरुण व्यावसायिकांमुळेच भारताची प्रगती साधली जाईल.
ZEP4.jpeg)
यावेळी डॉ. आनंद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यभर शिकण्याची वृत्ती आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता स्विकारुन दीर्घकालीन आणि गतिमान करिअरसाठी सज्ज होण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी शाश्वत व्यावसायिक यशाचे पाच आधारस्तंभ सांगितले — महत्त्वाकांक्षा, निरंतर शिक्षण, सांघिक कार्य , भक्कम वैयक्तिक मूल्ये आणि चिकाटी. त्यांनी पदवीधरांना नवोन्मेष आणि नेतृत्वाच्या माध्यमातून मूल्यनिर्मिती करण्यावर आणि समाजात अर्थपूर्ण योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

प्रा. अजय कुमार सूद यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण भारतीयांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि पदवीधरांना संशोधनाचे रूपांतर मोठ्या प्रमाणावर अंमलात आणता येऊ शकणाऱ्या आणि प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त ठरतील अशा बाबींमध्ये करण्याचे आवाहन केले. डीप-टेक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या सरकारी उपक्रमांचा उल्लेख करत ते म्हणाले की, देश वैज्ञानिक प्रगतीसाठी पोषक अशी परिसंस्था निर्माण करत आहे. जागतिक वैज्ञानिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, जीवशास्त्र आणि क्वांटम तंत्रज्ञान यांसारख्या नव्या विषयांचा अभ्यास करण्यास त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
WFIZ.jpeg)
2025-26 या वर्षाचा संस्थेचा अहवाल सादर करताना, आयआयटी गोवाचे संचालक प्रा. धीरेंद्र एस. कट्टी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या सहकार्याचा उल्लेख केला. आयआयटी गोवा आपल्या स्थापनेचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत असताना, त्यांनी अनेक नवीन शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली; यामध्ये पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी डबल-मेजर चा पर्याय, एम.टेक. कार्यक्रमांतर्गत नव्याने करता येण्यासारखे स्पेशलायजेशन, एम.एस. बाय रिसर्च हा नवीन कार्यक्रम आणि दोन वर्षांचे एम.एस्सी. कार्यक्रम सुरू करणे या अभ्यासक्रमांचा समावेश होता.
संशोधन क्षेत्राबाबत बोलताना प्रा. कट्टी म्हणाले की, संस्थेला एकूण सुमारे 690.88 लाख रुपयांचा निधी असलेले 15 एक्स्ट्रा-म्युरल रिसर्च (EMR) प्रकल्प मिळाले आहेत. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी 11 धोरणात्मक सामंजस्य करारांच्या माध्यमातून आयआयटी गोवाचे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्य विस्तारलेले आहे.
ते म्हणाले की, या पदवीधर बॅचचा प्लेसमेंट दर 92.25 टक्के इतका प्रभावी राहिला असून यातून संस्थेची वाढती प्रतिष्ठा आणि उद्योगांशी असलेला भक्कम संपर्क दिसून येतो.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
स्रोत : आयआयटी गोवा | आशिष सांगळे /राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2286595)
अभ्यागत कक्ष : 49