रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील ठाणे खाडीखाली भारताच्या समुद्राखालील पहिल्या बोगद्याच्या खोदकामाला दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने केला प्रारंभ 

प्रविष्टि तिथि: 18 JUL 2026 8:16PM by PIB Mumbai

 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सावली (घणसोली) पासून विक्रोळीच्या दिशेने दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) आज बोगदा खोदण्यास सुरुवात केली. 10 किलोमीटरच्या या टप्प्यापैकी 7 किलोमीटरचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून असेल. कोणत्याही रेल्वे कॉरिडॉरसाठी हा भारतातील पहिला समुद्राखालचा बोगदा असेल.

प्रकल्पातील एकूण 21 किमी लांबीच्या भुयारी बोगद्याच्या भागापैकी मुंबईतील सावली (घणसोली) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा 16 किमीचा भाग टनेल बोरिंग मशीन वापरून बांधण्यात येईल. पहिल्या टीबीएमने 5 जुलै 2026 रोजी विक्रोळीकडून बीकेसीच्या दिशेने 6 किमी अंतराचे काम आधीच सुरू केले आहे. उर्वरित 5 किमीचा भाग एनएटीएमच्या सहाय्याने आधीच पूर्ण झाला आहे.

टीबीएम

हे यंत्र म्हणजे भारतात रेल्वे बोगद्याच्या बांधकामासाठी आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्वात मोठ्या टीबीएमपैकी एक आहे. यात 13.6 मीटर व्यासाचे (4 मजली इमारतीच्या उंचीइतके) एक प्रचंड कटरहेड आहे, याचे वजन 3,200 टन (500 आशियाई हत्तींच्या वजनाइतके) आहे आणि याची एकूण लांबी 96 मीटर आहे ( एखाद्या फुटबॉल खेळपट्टीची लांबी 105 मीटर असते).

या यंत्रामध्ये अनेक महत्त्वाचे घटक आहेत, ज्यात कटर व्हील/हेड, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शील्ड, टेल शील्ड आणि बोगदा खोदण्याच्या कामांना साहाय्य करणाऱ्या चार विशेष गंत्री यांचा समावेश आहे.

यंत्राची रचना मिक्सशील्ड प्रकारातील, निमस्वयंचलित आणि स्लरी-आधारित टनेल बोरिंग मशीन (TBM) म्हणून करण्यात आली आहे. या मशीनमध्ये मिक्सशील्ड पद्धतीचा वापर करण्यात आला असून, उत्खननादरम्यान बोगद्याच्या पुढील भागाला स्थिर ठेवण्यासाठी प्रेशराइज्ड लिक्विड बेंटोनाइट स्लरी सर्किट कार्यरत असते. त्यामुळे गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीतही सुरक्षित, स्थिर आणि प्रभावीपणे बोगदा तयार करणे शक्य होते. ही पद्धत जगभरात विश्वासार्ह आणि सिद्ध तंत्रज्ञान म्हणून ओळखली जाते.

मुंबई उपनगरातील दाट लोकवस्तीच्या शहरी भागात बोगद्याचे काम करताना जमीन खचण्याचा धोका उद्भवू नये आणि जमिनीवरील वाहतूक, तसेच दैनंदिन जनजीवनावर होणारा परिणाम कमीत कमी राहावा, यासाठी मिक्सशील्ड तंत्रज्ञानाची विशेषतः निवड करण्यात आली आहे.

या टनेल बोरिंग मशीनमध्ये अत्याधुनिक सेमी-कंटिन्युअस ॲडव्हान्स प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्याच्या काँक्रीट सेगमेंट रिंग उभारणीचे काम आणि बोगद्याच्या पुढील भागाचे उत्खनन ही दोन्ही कामे एकाच वेळी, सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडता येतात.

या समांतर कार्यपद्धतीमुळे मशीनच्या प्रत्यक्ष उत्खननाचा वेग (नेट ॲडव्हान्स रेट) लक्षणीयरीत्या वाढतो. परिणामी प्रकल्पाचे काम नियोजित वेळेपेक्षा अधिक जलद पूर्ण करण्यास मदत होते.

प्रमुख आव्हान

टनेल बोरिंग मशीन भूमिगत मार्गावर उतरवून त्याच्या कामाची सुरुवात करण्यासाठी मुंबईतील सावळी येथे 39 मीटर खोल लाँचिंग शाफ्ट उभारण्यात आला आहे. ही खोली जमिनीखाली सुमारे 12 मजली इमारतीच्या उंचीइतकी आहे, ज्यामुळे या कामाच्या अभियांत्रिकी आव्हानांची कल्पना येते.

लाँचिंग शाफ्टमधील मर्यादित जागेचा प्रभावी वापर करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन वेगवेगळ्या भागांमध्ये खाली उतरवण्यात आले. सर्वप्रथम मशीनच्या गॅन्ट्री खाली उतरवून त्या आधीच एनएटीएम (NATM) पद्धतीने बांधलेल्या बोगद्यात पुढे सरकवण्यात आल्या. त्यानंतर मशीनचा मुख्य शिल्ड आणि कटरहेड शाफ्टमध्ये उतरवून त्यांची जोडणी करण्यात आली.

अतिरिक्त तपशील:

ट्रेलिंग बॅकअप प्रणालीमध्ये शिल्डच्या मागील बाजूस कामकाजाला सहाय्य करणाऱ्या 4 दुहेरी मजली गॅन्ट्रींचा समावेश आहे. या गॅन्ट्री साधारणपणे 18–20 मीटर लांबीच्या असून, त्या टीबीएम शिल्डच्या मागे रोलर क्रशर, प्राथमिक स्लरी पंप, प्राथमिक मशीन हायड्रॉलिक्स, ऑपरेटर केबिन, प्राथमिक ग्राउटिंग पंप/टाकी, वीजपुरवठा प्रणाली, आपत्कालीन आश्रय कक्ष, एअर डक्ट कॅसेट, वर्कबेंच सोबतच खुली कार्यशाळा, केबल ट्रे, होज रील्स आदी दुय्यम सहाय्यक प्रणालींना आधार देतात.

टीबीएममध्ये बहु-वायू प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण प्रणाली बसविण्यात आली असून ती मिथेन (2 सेन्सर), ऑक्सिजन (1 सेन्सर), कार्बन मोनॉक्साइड (1 सेन्सर) आणि कार्बन डायऑक्साइड (1 सेन्सर) यांचे सातत्याने निरीक्षण करते. अग्निसुरक्षा व्यवस्थेमध्ये स्वयंचलित अग्निशोध प्रणाली, मुख्य विद्युत वितरण पॅनेल आणि हायड्रॉलिक पॉवर पॅकवर थेट कार्यरत स्वयंचलित अग्निशमन प्रणाली, सुरक्षा जलपडदा आणि निर्धारित आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गावर सक्रिय स्वयंचलित जलफवारणी यंत्रणेचा समावेश आहे.

शाफ्ट परिसरात टीबीएमच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या विविध सहाय्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प, स्लरी प्रक्रिया प्रकल्प, बेंटोनाइट साठवण टाक्या, स्वतंत्र वीज उपकेंद्र, बॅकअप जनरेटर संच, ग्राउटिंगसाठी रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्प, स्लरी वाहतूक व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच इतर आवश्यक वाहतूक व पुरवठा पायाभूत सुविधांचा समावेश आहे.

सुरक्षित बोगदा खोदकाम आणि आजूबाजूच्या संरचनांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण प्रणाली बसविण्यात आली आहे. यासाठी सरफेस सेटलमेंट पॉइंट, ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर / टिल्ट मीटर, बाय रिफ्लेक्टिव्ह टार्गेट, स्ट्रेन गेज तसेच कंपन आणि भूकंपीय लहरींचे निरीक्षण करणारे भूकंपलेखक  यांसारखी उपकरणे वापरण्यात येत आहेत.

टीबीएमच्या साहाय्याने खोदण्यात येणारा बोगद्याचा भाग पूर्णपणे जलरोधक संरचना म्हणून तयार करण्यात येत आहे. संरचनेची कार्यक्षमता, भूजलाची स्थिती आणि एकूण बांधकाम सुरक्षिततेचे सातत्याने प्रत्यक्ष वेळेत निरीक्षण करण्यासाठी आधुनिक प्रणालीही बसविण्यात आल्या आहेत.

पाण्याची गळती रोखण्यासाठी बोगद्याच्या अस्तराचे संरक्षण दुहेरी स्तराच्या इथिलीन प्रॉपिलीन डायीन मोनोमर गॅस्केट आणि जलशोषक सील यांच्या संयुक्त वापराद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे संरचनेची दीर्घकालीन टिकाऊपणा आणि सुरक्षितता सुनिश्चित होते.

***

शैलेश पाटील/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/वैभवी जोशी/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2286213) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English