सांस्कृतिक मंत्रालय
'मून लँडिंग डे'निमित्त गोवा विज्ञान केंद्राकडून व्याख्यान,चित्रपट प्रदर्शन आणि 'ह्युमन गायरो'प्रदर्शनाचे आयोजन
Posted On:
17 JUL 2026 5:22PM by PIB Mumbai
पणजी,17 जुलै 2026
'अपोलो 11' मोहिमेद्वारे 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर मानवाने पहिले ऐतिहासिक पाऊल ठेवले. या घटनेच्या स्मरणार्थ, पणजी स्थित गोवा विज्ञान केंद्र 'इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स' (गोवा प्रादेशिक परिषद) यांच्या सहकार्याने, सोमवार, 20,जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12:15 या वेळेत केंद्राच्या आवारात 'मून लँडिंग डे' साजरा करणार आहे.
या उत्सवामध्ये वैज्ञानिक जागरूकता निर्माण करण्याच्या आणि विद्यार्थी, शिक्षक व सामान्य नागरिकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात 'अपोलो 11:अंतराळ शोधातील एक ऐतिहासिक टप्पा' या विषयावरील विज्ञान व्याख्यानाने होईल. गोवा विद्यापीठाच्या 'स्कूल ऑफ फिजिक्स अँड अप्लाइड सायन्सेस'मधील सहाय्यक प्राध्यापिका डॉ.रेश्मा राऊत देसाई हे व्याख्यान देतील. या व्याख्यानात 'अपोलो 11' मोहिमेची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान कामगिरी तसेच अंतराळ संशोधनावरील त्याचा दीर्घकालीन प्रभाव अधोरेखित केला जाईल.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,'ऑल दॅट मॅटर्स'हा प्रसिद्ध माहितीपट दाखविला जाईल. या माहितीपटात प्रसिद्ध भारतीय कण भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री प्रा.रोहिणी मधुसूदन गोडबोले यांचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास मांडला आहे.चित्रपट प्रदर्शनानंतर, त्याच्या निर्मात्या ममता सिंग यांच्यासोबत एक संवाद सत्र होईल; यात उपस्थितांना विज्ञान प्रसार आणि भारतातील एका आघाडीच्या शास्त्रज्ञाचे जीवन या विषयावरील चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल.
गोवा विज्ञान केंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या 'ह्युमन गायरो' (Human Gyro) या परस्परसंवादी प्रदर्शनाचे सार्वजनिक उद्घाटन या सोहळ्याचे एक प्रमुख आकर्षण आहे. प्रामुख्याने अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी विकसित केलेले हे उपकरण सहभागींना विविध अक्षांवर फिरवते, ज्यामुळे अंतराळ प्रवासादरम्यान जाणवणारी दिशाहीन आणि भारहीन स्थिती यांचा रोमांचक अनुभव मिळतो. अंतराळ विज्ञान आणि प्रयोगशील शिक्षणात रस असलेल्या अभ्यागतांसाठी हे प्रदर्शन एक मुख्य आकर्षण ठरेल अशी अपेक्षा आहे.
गोवा विज्ञान केंद्राने विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी आणि सामान्य नागरिकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे, नवीन प्रदर्शनाचा अनुभव घेण्याचे आणि अंतराळ विज्ञानाचे अचंबित करणारे जग जाणून घेण्याचे आवाहन केले आहे.
पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2285821)
अभ्यागत कक्ष : 55