अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी', नागपूर येथे अलीकडेच पदोन्नती मिळालेल्या प्राप्तिकर साहाय्यक आयुक्तांसाठी 'उत्तरायण 2026' ओरिएंटेशन कार्यक्रम सुरू

Posted On: 16 JUL 2026 7:38PM by PIB Mumbai

नागपूर येथील 'राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी' (NADT) मध्ये आज 'उत्तरायण 2026' या सात आठवड्यांच्या सर्वसमावेशक ओरिएंटेशन प्रोग्रामचा अर्थात अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ झाला. प्राप्तिकर विभागाच्या या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेत हा प्रतिष्ठेचा उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. मनाली मकरंद क्षीरसागर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या तुकडीला संबोधित केले. राष्ट्रनिर्मितीमध्ये कर प्रशासकांची बदलती भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर प्रा. मनाली क्षीरसागर यांनी प्रकाश टाकला. तसेच, पारदर्शक, कार्यक्षम आणि करदात्यांना अनुकूल असे प्रशासकीय वातावरण निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानातील प्रगतीचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.


'उत्तरायण 2026' तुकडीतील अधिकारी अफाट क्षेत्रीय अनुभव आणि प्रशासकीय कौशल्य घेऊन अकादमीमध्ये आले आहेत. या प्रशिक्षणार्थी गटात एकूण 106 अधिकारी आहेत, ज्यामध्ये 22 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे; या महिला अधिकारी त्यांच्या कारकिर्दीतील एका महत्त्वच्या टप्प्यावर आहेत. या अधिकाऱ्यांकडे प्राप्तिकर विभागातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या वैयक्तिक सेवेचा कालावधी किमान 17 वर्षांपासून ते कमाल 39 वर्षांपर्यंत असून, या संपूर्ण तुकडीचा सरासरी सेवा कालावधी 27 वर्षे इतका आहे.


शैक्षणिकदृष्ट्या, ही तुकडी विविध विद्या शाखांमधील वैविध्यपूर्ण शैक्षणिक पात्रता असलेली आहे.
या गटाचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आणि अखिल भारतीय आहे. यामध्ये 20 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बिहारमधून सर्वाधिक म्हणजे 15 प्रशिक्षणार्थी अधिकारी आले असून त्या खालोखाल महाराष्ट्रातील 10 अधिकारी प्रतिनिधित्व करत आहेत.


सात आठवड्यांच्या या सखोल प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत या अनुभवी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कर कायदे, कॉर्पोरेट लेखांकन, आधुनिक तपास पद्धती, सार्वजनिक प्रशासन आणि ई-गव्हर्नन्सचे नवीन उपक्रम यांसारख्या विषयांवर प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे सर्व अधिकारी विभागातील नेतृत्व आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी सक्षम होतील.

***

सोनाली काकडे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2285551) अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein: English