अर्थ मंत्रालय
‘नाबार्ड, महाराष्ट्र’चा 45वा स्थापना दिन पुण्यात उत्साहात साजरा; महिला शेतकऱ्यांचा गौरव
महिला या कृषी क्षेत्राचा कणा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2026 3:52PM by PIB Mumbai
पुणे, 16 जुलै 2026
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाने 16 जुलै 2026 रोजी पुणे येथे आपला 45वा स्थापना दिन उत्साहात साजरा केला. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष – 2026 निमित्त आयोजित या कार्यक्रमातून सर्वसमावेशक, शाश्वत आणि हवामान बदलास तोंड देणाऱ्या ग्रामीण विकासाप्रती नाबार्डची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय विठोबा भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यातील महिला शेतकरी, महिला-प्रवर्तित शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), स्वयं-सहाय्यता बचत गट (SHGs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) तसेच ग्रामीण उद्योजक यांचा ग्रामीण परिवर्तनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास श्री. जयकिश, मुख्य महाव्यवस्थापक व प्राचार्य, CAB, पुणे; श्री. विवेक नाचणे, महाव्यवस्थापक व निमंत्रक, SLBC, महाराष्ट्र; डॉ. भरत काकडे, अध्यक्ष, BAIF; तसेच श्री. विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपस्थित होते. डॉ. ए. व्ही. भवानी शंकर, मुख्य महाव्यवस्थापक, नाबार्ड, महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
यावेळी "Empowering Rural Maharashtra: NABARD 2025-26" या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या नाबार्ड समर्थित बॅकयार्ड पोल्ट्री उपजीविका प्रकल्पावरील माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

कृषिमंत्र्यांनी अधोरेखित केली राज्य शासनाची शेतकरी कल्याणाची बांधिलकी
मा. श्री. दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी व सहकार क्षेत्राच्या विकासासाठी गेल्या 45 वर्षांपासून नाबार्डने दिलेल्या योगदानाचे कौतुक करत महिला शेतकऱ्यांना "कृषि क्षेत्राचा कणा" असे संबोधले.
राज्य शासनाच्या शेतकरी-केंद्रित उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ₹50000 प्रोत्साहन, 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज, नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत 5 लाख हेक्टरचे उद्दिष्ट, एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना AgriStack डिजिटल ओळख, महाविस्तार-AI व वसुधा यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी सल्ला तसेच पशुधन उद्योजक आणि मत्स्य संपदा योजना यांद्वारे वाढीव उपजीविकेच्या संधी यांचा विशेष उल्लेख केला.
ते म्हणाले की, प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठा 2023-24 मधील ₹6.40 लाख कोटींवरून 2025-26 मध्ये ₹9.20 लाख कोटींवर पोहोचला आहे. तसेच कृषी कर्जवाटप ₹1.54 लाख कोटींवरून ₹1.93 लाख कोटींवर वाढले असून, विशेषतः लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) चा विस्तार करण्याचे आवाहन त्यांनी बँकांना केले.

महिला सक्षमीकरणाचा उल्लेख करताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि उमेद अभियान यांचा उल्लेख केला. या माध्यमातून राज्यातील 50 लाखांहून अधिक महिला स्वयं-सहाय्यता गटांतील सदस्यांना ₹50000 कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करून त्यांना 'लखपती दीदी' बनविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाबार्डने उमेद, MAVIM आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्या (Women FPCs) यांच्याशी अधिक दृढ सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्याच्या 'विकसित महाराष्ट्र 2047' या संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याचे लक्ष्य ग्रामीण भाग, शेती आणि सहकार क्षेत्राच्या बळावरच साध्य होईल, असे प्रतिपादन केले.

नाबार्ड महाराष्ट्रासाठी विक्रमी वर्ष
डॉ. ए. व्ही. भवानी शंकर यांनी सांगितले की, 2025-26 हे वर्ष नाबार्ड महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरले असून, व्यवसाय सहाय्य व पुनर्वित्ताची रक्कम ₹39380 कोटींवर पोहोचली आहे. राज्य शासनाला थेट पायाभूत सुविधा विकासासाठी सुमारे ₹5600 कोटींचे सहाय्य देण्यात आले असून, विविध विकासात्मक व अनुदानाधारित उपक्रमांसाठी ₹37.72 कोटींची मदत करण्यात आली.
त्यांनी PACS चे संगणकीकरण, बहुउद्देशीय PACS, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उद्योगांना नाबार्डकडून सातत्याने मिळणाऱ्या पाठबळाची माहिती दिली .
महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि ग्रामीण संस्थांचे बळकटीकरण हे महाराष्ट्रातील 'विकसित भारत @2047' या नाबार्डच्या धोरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. स्मृती भगत, महाव्यवस्थापक यांनी स्वागतपर भाषण केले. तर श्री. अविनाश पी. सेवलकर, महाव्यवस्थापक, नाबार्ड महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय यांनी उपस्थितांचे आभार मानले.
***
हर्षल अकुडे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285369)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English