अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाबार्ड (NABARD) गोवाच्या 45 व्या स्थापना दिनानिमित्त प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान


गोव्याची ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शाश्वत शेतीमधील नाबार्डच्या (NABARD) योगदानाची आयसीएआर-सीसीएआरआयकडून प्रशंसा

Posted On: 15 JUL 2026 3:56PM by PIB Mumbai

पणजी,15 जुलै 2026

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) गोवा प्रादेशिक कार्यालयाने 14 जुलै रोजी पणजीतील पाट्टो येथील 'द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ येथे आपला 45 वा स्थापना दिवस साजरा केला. कृषी आणि ग्रामीण विकासातील महिलांची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थितांना संबोधित करताना, प्रमुख पाहुणे आणि आयसीएआर-सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी समर्पित सेवेची 45 वर्षे पूर्ण केल्याबद्दल नाबार्डचे अभिनंदन केले आणि कृषी आणि ग्रामीण विकासाकरता दिलेल्या महत्वाच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी खाजण जमिनींचे पुनरुज्जीवन, शाश्वत शेतीला प्रोत्साहन आणि फिनफिश मत्स्यपालनाचा विकास, यासारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमधील आयसीएआर-सीसीएआरआय आणि नाबार्ड यांच्यातील मजबूत भागीदारीवर प्रकाश टाकला. गोव्याच्या कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी त्यांनी शेतकरी-केंद्रित संशोधन, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांच्या महत्त्वावरही भर दिला.

सेंद्रिय शेती, एकात्मिक शेती, कृषी-प्रक्रिया आणि समुदाय आधारित कृषी उपक्रमांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या गोव्यातील प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. काही पुरस्कार विजेत्यांनी त्यांचे प्रेरणादायी अनुभव सांगितले. त्यांनी नाविन्यपूर्ण शेती पद्धती, मूल्यवर्धन, उद्योजकता आणि सुधारित बाजारपेठ प्रवेश यावर प्रकाश टाकला. शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी), शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) आणि बचत गट (एसएचजी) यांच्या द्वारे स्थानिक पातळीवर उत्पादित कृषी उत्पादने आणि मूल्यवर्धित वस्तूंचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला गोवा सरकारचे सहकारी संस्थांचे निबंधक आशुतोष आपटे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक डॉ. प्रशांत कदम, 'द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.'चे अध्यक्ष पांडुरंग कुर्तिकर, गोवा ग्रामीण विकास संचालनालयाच्या संचालक दिपाली नाईक, मधुमक्षिका पालन शेतकरी उत्पादक संघटनेच्या अध्यक्ष सविता रमेश तवडकर आणि गोव्याच्या विविध भागातील महिला शेतकरी उपस्थित होत्या. आर्थिक समावेशन, सुधारित बाजारपेठ प्रवेश, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत ग्रामीण विकासाद्वारे कृषी क्षेत्रातील महिलांना सक्षम करण्याच्या नव्या वचनबद्धतेसह या कार्यक्रमाची सांगता झाली.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2284834) अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein: English