शिक्षण मंत्रालय
विविध भागधारकांच्या पुढाकारातून, नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS)– समुदाय आधारित व्यसनमुक्ती सेवा अधिक मजबूत केल्या
Posted On:
15 JUL 2026 3:18PM by PIB Mumbai
नागपूर,15 जुलै 2026
नागपूर मधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, अर्थात एम्स ने त्यांच्या मानसोपचार विभागाअंतर्गत येणाऱ्या उपचार सुविधा केंद्र (एटीएफ), प्रवाह फाउंडेशन आणि नागपूर ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, समुदाय-आधारित व्यसनमुक्ती सेवा बळकट करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत पी. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश, अंमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित विकारांबाबत प्रतिबंध, उपचार आणि समुदाय संपर्क अधिक सुधारणे हा आहे.

या चर्चासत्राला नागपूर ग्रामीण पोलिसचे सहायक पोलीस अधीक्षक सागर यशवंत खर्डे, प्रवाह फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि एम्स नागपूरमधील मानसोपचार विभागातील प्राध्यापक सदस्य उपस्थित होते. व्यसनाधीनतेशी संबंधित काळीमा कमी करणे, व्यसनाधीनता हा योग्य उपचाराने बरा होऊ शकणारा वैद्यकीय आजार आहे याबद्दल जनजागृती करणे आणि उपचार सेवा वेळेवर घेण्याबाबत प्रोत्साहन देणे आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, नागपूर ग्रामीण पोलिसांकडून व्यसनाधीन व्यक्ती शोधून त्यांना नागपूर एम्स मध्ये तपासणी आणि उपचारांसाठी पाठवण्यात येईल. चर्चासत्राच्याच दिवशी अशा व्यक्तींना पुढील उपचारांसाठी पाठवण्याची अर्थात ‘रेफरल’ प्रक्रिया सुरु करण्यात आली. समुदाय पातळीवर व्यसनमुक्ती सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे एक महत्वाचे पाउल आहे.
सहभागींना संबोधित करताना प्रा. डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या व्यसनांशी संबंधित समस्यांचा सामना करण्यासाठी आरोग्य संस्था, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांच्यातील समन्वित कृतींचे महत्व अधोरेखित केले. जनजागृती उपक्रम अधिक व्यापक करणे, पुनर्वसनाचे प्रयत्न अधिक बळकट करणे आणि एक निरोगी, व्यसनमुक्त समाज तयार करण्याच्या दिशेने कार्य करण्याच्या सामूहिक वचनबद्धतेसह या चर्चासत्राचा समारोप झाला.
आशिष सांगळे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2284803)
अभ्यागत कक्ष : 41