संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोणावळा येथील INS शिवाजी येथे 'ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प 2026' ची सांगता


मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयाने विजेतेपदाचा करंडक जिंकून पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

प्रविष्टि तिथि: 13 JUL 2026 6:14PM by PIB Mumbai

मुंबई, 13 जुलै 2026

 

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) नौदल शाखेच्या छात्रांच्या महत्त्वाच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिर, 'ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प 2026' ची लोणावळा येथील INS शिवाजी येथे सांगता झाली. एनसीसी महासंचालनालय मुख्यालयाच्या वतीने महाराष्ट्राच्या एनसीसी संचालनालयाने आयोजित केलेल्या या शिबिरात व्यावसायिक लष्करी प्रशिक्षण, सागरी कौशल्य विकास, नेतृत्व आणि राष्ट्रीय एकात्मता अशा सर्वांगीण कार्यक्रमासाठी देशातील सर्वोत्तम एनसीसी छात्र एकत्र आले होते.

एनसीसी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक  मेजर जनरल विवेक त्यागी यांनी या सांगता कार्यक्रमाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आयएनएस शिवाजीचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर एस. पार्थिबन उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र एनसीसी संचालनालय आणि आयएनएस शिवाजीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयाने विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठेचा विजेतेपदाचा करंडक जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र संचालनालयाची कॅडेट तीया राजेश आवळे हिला 'बेस्ट गर्ल कॅडेट', तर आसाम संचालनालयाचा कॅडेट सोधा राजवीर सिंग याला 'बेस्ट बॉय कॅडेट' म्हणून घोषित करण्यात आले. या शिबिरात देशभरातील सर्व 17 एनसीसी संचालनालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या नौदल शाखेच्या 612 छात्रांनी भाग घेतला, ज्यामध्ये 204 महिला छात्रांचा समावेश होता.

या आठवड्याच्या सुरुवातीला एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स, वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांनी दिलेली भेट हे या शिबिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. छात्रांना संबोधित करताना, त्यांनी त्यांच्या शिस्तीचे, उत्साहाचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले, तसेच त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. यानंतर झालेल्या एका संवादात्मक चर्चेदरम्यान, त्यांनी त्यांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीतील अनुभव सामायिक केले, आणि छात्रांना राष्ट्र उभारणीच्या त्यांच्या प्रवासात नेतृत्व, सचोटी, चिकाटी आणि निःस्वार्थी सेवा ही शाश्वत मूल्ये अंगीकारण्याची प्रेरणा दिली.

या शिबिरामध्ये समुद्रातील आव्हानांची अनुभूती देणाऱ्या आव्हानात्मक नौदल विद्याशाखांमध्ये उत्साही स्पर्धा पाहायला मिळाल्या. बोट पुलिंग, ड्रिल, सेमाफोर (Visual Signalling), फायरिंग आणि शिप मॉडेलिंग यांसारख्या स्पर्धांमध्ये छात्रांनी उल्लेखनीय व्यावसायिकता, अचूकता आणि सांघिक भावना प्रदर्शित केली. नौदल कर्मचाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान छात्रांनी ड्रोन ऑपरेशन्स, सायबर सुरक्षा, सागरी नेव्हिगेशन, अग्निशमन आणि डॅमेज कंट्रोल, समुद्रात आपला बचाव करण्याची कौशल्ये, दळणवळण प्रक्रिया, नौदल नेतृत्व आणि सीमॅनशिप यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह ज्ञान प्राप्त केले.

ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प 2026 च्या यशस्वी आयोजनाने, देशाच्या भावी नेत्यांमध्ये सागरी जागृती, नेतृत्व आणि सेवेची भावना दृढ करत, शिस्तबद्ध, कुशल आणि राष्ट्रीय दृष्ट्या जागरूक तरुण विकसित करण्याप्रति राष्ट्रीय छात्र सेनेच्या अविचल वचनबद्धतेची पुष्टी केली.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284229) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English