कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालयाच्या आर्थिक वर्ष 2024–25 च्या मूल्यांकनात वेस्टर्न कोलफील्डस् लि.च्या सर्वाधिक खाणींना पंचतारांकित श्रेणी

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 9:12PM by PIB Mumbai

नागपूर, 10 जुलै 2026

 

वेस्टर्न कोलफील्डस् लि. (डब्ल्यूसीएल) ने कोळसा मंत्रालयाच्या आर्थिक वर्ष 2024–25 साठीच्या तारांकित मूल्यांकनात सर्व कोळसा कंपन्यांमध्ये सर्वाधिक खाणींना पंचतारांकित श्रेणी मिळवून सर्वोच्च कामगिरी नोंदविली आहे. डब्ल्यूसीएलच्या सात खाणींना हा प्रतिष्ठेचा दर्जा मिळाला असून, सुरक्षित, वैज्ञानिक आणि शाश्वत खाणकामासाठी कंपनीची सातत्यपूर्ण वचनबद्धता यामुळे अधोरेखित झाली आहे.

पंचतारांकित श्रेणी प्राप्त केलेल्या सात खाणींमध्ये पाटणसावंगी भूमिगत खाण (नागपूर), नांदगाव उतारावरील भूमिगत खाण (चंद्रपूर), सावनेर खाण क्र. 1 भूमिगत आणि सावनेर खाण  क्र. 2 भूमिगत (नागपूर), मकरधोकडा - I खुली खाण आणि दिनेश / एमकेडी - III खुली खाण (उमरेड), तसेच मुणगोली खुली खाण (वणी) यांचा समावेश आहे. याबरोबरच डब्ल्यूसीएलच्या 25 खाणींना चार तारांकित; तर 15 खाणींना त्रितारांकित श्रेणी मिळाली.

या यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करताना डब्ल्यूसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत शरद पांडे यांनी सांगितले की, ही कामगिरी सुरक्षितता, पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि कार्यात्मक उत्कृष्टतेची सर्वोच्च मानके कायम राखण्यासाठी कर्मचारी आणि भागधारकांच्या समर्पणाचे व व्यावसायिकतेचे प्रतिबिंब दर्शविते. देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेला हातभार लावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत खाणकाम पद्धतींचा अवलंब करण्याबाबत डब्ल्यूसीएलच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

कोळसा मंत्रालयाच्या तारांकित मूल्यांकन प्रणाली अंतर्गत खाणींचे मूल्यमापन वैज्ञानिक खाणकाम पद्धती, व्यावसायिक सुरक्षितता, पर्यावरण व्यवस्थापन, भूमी पुनर्वसन, तंत्रज्ञानाचा अवलंब, वैधानिक नियमांचे पालन आणि सामाजिक उत्तरदायित्व अशा महत्त्वाच्या निकषांवर केले जाते. डब्ल्यूसीएलच्या सात पंचतारांकित श्रेणी मिळविलेल्या खाणींनी या सर्व निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत सुरक्षित खाणकाम, संसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण यामध्ये उत्कृष्ट यश साध्य केले आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283496) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English