संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘एनसीसी’च्या महासंचालकांची आयएनएस शिवाजी येथील 'अखिल भारतीय नौसैनिक शिबिर 2026' ला भेट; 600 हून अधिक छात्रांना केले प्रेरणादायी मार्गदर्शन

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2026 8:23PM by PIB Mumbai

मुंबई, 9 जुलै 2026

राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स, (वायएसएम, एसएम, व्हीएसएम) यांनी आज लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे आयोजित अखिल भारतीय नौसैनिक शिबिर (एआयएनएससी) 2026 ला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी होते.

आयएनएस शिवाजी येथे आगमन झाल्यावर स्मार्ट वेशातील एनसीसी छात्रांनी महासंचालकांना औपचारिक मानवंदना दिली, जी एनसीसीचा आधारस्तंभ असलेल्या शिस्त, अचूकता आणि लष्करी बाणा या सर्वोच्च परंपरांचे प्रतीक होती.

या भेटीदरम्यान महासंचालकांनी अत्यंत चुरशीची डीके व्हेलर बोट पुलिंग स्पर्धा पाहिली. त्यांना शिप मॉडेलिंग स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहितीही देण्यात आली. या शिबिरात छात्रांच्या मूलभूत नौदल प्रवीणतेची आणि सैद्धांतिक पायाची चाचणी एका व्यापक सेवा विषयाच्या लेखी परीक्षेद्वारे आणि आरोग्य व स्वच्छता परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाते.

छात्रांनी दाखवलेल्या उच्च दर्जामुळे प्रभावित होऊन महासंचालकांनी प्रशिक्षणाच्या मानकांची तसेच छात्रांच्या व्यावसायिक कौशल्याची प्रशंसा केली. मागील आठवड्यात प्रतिकूल हवामानाचा सामना करूनही सहभागींनी दाखवलेला दृढनिश्‍चय, उत्साह आणि चिकाटी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. 204 महिला छात्र, 26 संलग्न एनसीसी अधिकारी (एएनओ), 13 महिला छात्र प्रशिक्षक (जीसीआय) आणि संरक्षण दल प्रशिक्षक यांच्यासह एकूण 612 एनसीसी नौदल छात्र या कार्यक्रमांचा अविभाज्य भाग होते. 

राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी शिबिराच्या आयोजनासाठी आयएनएस शिवाजी येथे उभारण्यात आलेली निवासव्यवस्था, प्रशिक्षण सुविधा, शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्था यांचीही सर्वसमावेशक पाहणी केली.

राष्ट्रीय सुरक्षेचे बदलते स्वरूप आणि तांत्रिक प्रगती यावर भर देत महासंचालकांनी छात्रांना ड्रोन तंत्रज्ञान आणि सायबर जागरूकता यांसारख्या भविष्यवेधी आणि दूरदृष्टीच्या क्षेत्रांचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले. नेतृत्व, शिस्त आणि देशभक्ती यांसोबतच तांत्रिक क्षमता विकसित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला, जेणेकरून 'विकसित भारत @2047' या राष्ट्रीय दृष्टिकोनाच्या पूर्ततेसाठी युवावर्ग एक मजबूत, सुरक्षित आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी प्रभावीपणे योगदान देऊ शकेल. महासंचालकांनी शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे आणि अविरत पाठिंब्याबद्दल आयएनएस शिवाजीचे कौतुक केले. या अत्यंत स्पर्धात्मक कार्यक्रमाचा निकाल 12 जुलै, 2026 रोजी समारोप समारंभात जाहीर केला जाईल.

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2283049) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English