मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
सीफूड एक्स्पो भारत 2026 मध्ये महाराष्ट्रातील तीन महिला बचत गटांनी प्रदर्शित केली आपापली सागरी खाद्योत्पादने
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2026 5:19PM by PIB Mumbai
मुंबई, 9 जुलै 2026
चेन्नई इथे 1 ते 3 जुलै दरम्यान सीफूड एक्स्पो भारत 2026 हा सागरी खाद्योत्पादन विषयक प्रदर्शन उपक्रम पार पडला. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन स्वयंसहाय्यता गटांनी सहभाग घेतला होता. या बचत गटांनी आपली मूल्यवर्धित सागरी खाद्योत्पादने या प्रदर्शनात मांडली होती. रायगड जिल्ह्याच्या गव्हाण या गावातील मत्स्यकन्या बचत गट, रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरगाव या गावातील विश्वकर्मा बचत गट आणि पालघर जिल्ह्याच्या चटाळे या गावातील श्री सिद्धी विनायक बचत गट हे तीन बचत गट या प्रदर्शनात सहभागी झाले होते.
या तीन दिवसीय प्रदर्शनात या बचत गटांनी एका स्वतःसाठीच्या समर्पित दालनांमध्ये आपली सागरी खाद्योत्पादने मांडली होती. या संपूर्ण कालावधीत त्यांनी ग्राहकांसाठी या खाद्योत्पादनाचे चाचणी सत्र (टेस्टिंग सेशन्स) आयोजित करून चव घेण्याची संधीही ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती. भारतातील सागरी किनारपट्टीलगतच्या समुदायांमधील हवामान विषयक लवचिकता विस्तार प्रकल्प, या प्रकल्पांतर्गत (ECRICC) या महिला बचत गटांच्या सहभागाला पाठबळ पुरवण्यात आले होते.

भारतातील सागरी किनारपट्टीलगतच्या समुदायांमधील हवामान विषयक लवचिकता विस्तार प्रकल्प, हा केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. या प्रकल्पाला हरित हवामान निधी आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्रात राज्याच्या वन विभागाच्या अखत्यारीतील कांदळवन कक्ष अंमलबजावणीची समन्वयक संस्था म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत हवामान बदलाच्या परिणामांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या किनारीपट्टीलगतच्या समुदायांना, विशेषतः महिलांना शाश्वत उपजीविका विकसित करण्यासाठी पाठबळ पुरवले जाते अशी माहिती मुंबईतील कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि भारतातील सागरी किनारपट्टीलगतच्या समुदायांमधील हवामान विषयक लवचिकता विस्तार प्रकल्पाचे राज्य प्रकल्प संचालक एन. आर. प्रवीण यांनी दिली. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्याव्यतिरिक्त, या प्रकल्पांतर्गत कौशल्य प्रशिक्षण, अभ्यास दौरे आणि बाजारपेठेशी जोडणी देखील उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (MPEDA) वतीने सीफूड एक्स्पो भारत 2026 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात देशभरातील सागरी खाद्योत्पादक, प्रक्रिया करणारे, निर्यातदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकत्र आले होते.

बचत गटांच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने देखील या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमुळे जागतिक सीफूड बाजारपेठ समजून घेण्याची आणि उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन कल्पना शिकण्याची संधी मिळाली अशी भावना मत्स्यकन्या बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा घरत यांनी व्यक्त केली. आपल्या गावातील जास्तीत जास्त महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची वचनबद्धताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रदर्शनात भारतातील सागरी किनारपट्टीलगतच्या समुदायांमधील हवामान विषयक लवचिकता विस्तार प्रकल्पाचे दालनही उभारण्यात आले होते. या दालनाला प्रदर्शनासाठी आलेल्या 100 पेक्षा जास्त जणांनी भेट दिली. तामिळनाडूचे मत्स्यपालन आणि मच्छीमार कल्याण मंत्री ए. श्रीनाथ आणि मालदीवचे मत्स्यपालन, कृषी आणि महासागर संसाधने राज्यमंत्री डॉ. अमझथ अहमद यांनीही या दालनाला भेट दिली. या सगळ्यांनी या प्रदर्शनातील उत्पादनांचे कौतुक केले तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्पादनांची जागतिक क्षमता अधोरेखित केली असून, यामुळे शाश्वत उपजीविकेसाठी बाजारपेठांसोबतची भक्कम जोडणी प्रस्थापित करण्यास मदत होईल अशी आशा भारतातील सागरी किनारपट्टीलगतच्या समुदायांमधील हवामान विषयक लवचिकता विस्तार प्रकल्पाचे महाराष्ट्राचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक विक्रम यादव यांनी व्यक्त केली.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282904)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English