परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्यासाठी ग्लोबल साऊथ देशांच्या महावाणिज्यदूतांसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे मुंबई शाखा सचिवालय आणि ACTREC तर्फे अभ्यास दौऱ्याचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
02 JUL 2026 3:27PM by PIB Mumbai
मुंबई, 2 जुलै 2026
परराष्ट्र मंत्रालयाचे मुंबई शाखा सचिवालय आणि अणुऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत असलेली टाटा मेमोरियल सेंटरची अनुदानित संस्था— 'ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर' (ACTREC) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच 'ग्लोबल साउथ' देशांमधील महावाणिज्य दूत आणि राजनैतिक प्रतिनिधींसाठी एका विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोग उपचार, संशोधन, क्षमता बांधणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या संधी शोधणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमामध्ये अफगाणिस्तान, इजिप्त, मॉरिशस, श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशांच्या महावाणिज्य दूतांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच बांगलादेश, कोलंबिया आणि येमेन या देशांच्या वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ अधिकारीही या दौऱ्यात सामील झाले होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी, समान सामाजिक-आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आव्हानांचा सामना करणाऱ्या देशांसोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कर्करोग उपचार आणि संशोधनातील अशा संयुक्त उपक्रमांमुळे 'ग्लोबल साउथ'च्या देशांमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांचा समान हक्क आणि पोहोच सुधारण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

ACTREC चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी आणि ACTREC चे उपसंचालक डॉ. नवीन खत्री यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा सादर केला. तसेच कर्करोग उपचार आणि संशोधनातील ACTREC चे अग्रगण्य कार्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि नाविन्यपूर्ण संशोधन, शिक्षण व क्षमता बांधणी या क्षेत्रांतील चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
'ग्लोबल साउथ' देशांसोबतच्या संबंधांमध्ये 'आरोग्य विषयक मुत्सद्देगिरी'बाबत भारताच्या भूमिकेवर परराष्ट्र मंत्रालय सचिवालयाचे मुंबई शाखा प्रमुख स्वप्नील थोरात यांनी प्रकाश टाकत, सहभागी प्रतिनिधींना भारत सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य आणि इतर प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांमधील सहकार्याद्वारे भागीदार देशांमध्ये स्वावलंबन, शाश्वत वाढ आणि विकासाला चालना देणे हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या संवादानंतर अभ्यासपूर्ण चर्चा झाली आणि त्यानंतर ACTREC च्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या आवारातच असलेल्या अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा व लहान मुलांच्या कर्करोग रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी एका विशेष दौऱ्याचे आयोजन केले होते.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2280315)
आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English