अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्तू आणि सेवाकराने अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, सहकारी संघराज्यवादाला बळकटी दिली आहे आणि कर अनुपालन सुधारले आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सीजीएसटी मुंबई विभाग आणि एसजीएसटी, महाराष्ट्र यांनी एकत्रितपणे 9वा जीएसटी दिन साजरा केला

महाराष्ट्राने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जीएसटी महसुलात उल्लेखनीय वाढ नोंदवली

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2026 8:06PM by PIB Mumbai

मुंबई, 1 जुलै 2026

 

एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ म्हणून भारतात परिवर्तन घडवून आणणाऱ्या  ऐतिहासिक अप्रत्यक्ष कर सुधारणांच्या अंमलबजावणीचा दिवस अर्थात नववा जीएसटी दिन 2026 आज सीजीएसटी मुंबई विभाग आणि एसजीएसटी, महाराष्ट्र यांनी एकत्रितपणे मुंबईत साजरा केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचे अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की वस्तू आणि सेवाकरामुळे भारताच्या अप्रत्यक्ष करप्रणालीला एक ऐतिहासिक वळण लाभले असून देशाने एका पारदर्शक, तंत्रज्ञान आधारित आणि करदात्यांना अनुकूल अशा करव्यवस्थेत प्रवेश केला आहे. जीएसटीने भारताला कर नियमांचे पालन करणारा देश बनवले आहे, तसेच सर्व क्षेत्रांतील व्यवसायांना एक निष्पक्ष आणि समान संधी उपलब्ध करून दिली आहे.

जीएसटी वर सर्वांची सहमती मिळवण्यास अनेक वर्षे लागली असे फडणवीस म्हणाले. मूल्य वर्धित कर लागू केल्यानंतरही महाराष्ट्रात महानगरपालिका जकात करासह अनेक अप्रत्यक्ष कर अस्तित्वात होते, ज्यामुळे करदात्यांवर अनुपालनाचा मोठा भार आणि कर प्राधिकरणांसमोर प्रशासकीय आव्हाने निर्माण झाली होती. अप्रामाणिक घटकांकडून होणाऱ्या करचुकवेगिरीमुळे प्रामाणिक व्यवसायांनाही फटका बसत होता, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाने जीएसटीच्या अंमलबाजवणीत महत्त्वाची भूमिका बजावली असे फडणवीस म्हणाले. सर्व राज्यांमध्ये याबाबत निर्णायक सहमती बनवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनाही त्यांनी आदरांजली अर्पण केली.  केंद्र  सरकारने राज्यांना पाच वर्षांसाठी दरवर्षी 14 टक्के महसूल वाढीचे आश्वासन देण्याचा घेतलेला निर्णय हा एक धाडसी आणि आत्मविश्वास वाढवणारा निर्णय होता, ज्यामुळे जीएसटीची यशस्वी अंमलबजावणी शक्य झाली, असे त्यांनी सांगितले.

जीएसटी परिषद हा  जीएसटी प्रणालीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ असून हे सहकारी संघराज्यवादाचे खरे उदाहरण आहे कारण येथे केंद्र सरकार आणि राज्यसरकार एकत्रितरित्या सहमतीवर आधारित निर्णय घेतात. जीएसटी नेटवर्क हे तंत्रज्ञान नवोन्मेषाचे एक उज्ज्वल उदाहरण असून देशभरात जीएसटी यशस्वीपणे लागू करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असेही ते म्हणाले.

जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र यापुढेही सातत्यपूर्ण वाढ नोंदवत राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राला जीएसटी वाटा म्हणून जवळपास 1.87 लाख कोटी रुपये मिळाले. महाराष्ट्र हे  देशातील जीएसटी संकलनात सर्वाधिक योगदान देणारे राष्ट्र म्हणून कायम असून राज्याने कर्नाटक आणि गुजरात या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या दोन्ही राज्यांच्या एकत्रित जीएसटी संकलनापेक्षा अधिक संकलन केले आहे.

करप्रशासनात तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले की कृत्रिम बुद्धीमत्ता, डिजिटल बुद्धीमत्ता आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कर अंमलबजावणी अधिक सुलभ आणि प्रभावी होईल याची सुनिश्चिती करतानाच कर अनुपालन अधिक मजबूत करतील.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 2.0 सुधारणांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की संरचनात्मक बदल आणि कर टप्प्यांचे सुसूत्रीकरण यांनी अनुपालनात सुलभता आणून तसेच विकासासाठी आणखी संधी निर्माण करून व्यवसायांना लाभ मिळवून दिला आहे. ते पुढे म्हणाले की, सध्या हाती घेण्यात येत असलेल्या सुधारणा आणि सुलभीकरण उपायांच्या माध्यमातून व्यवसाय सुलभता  आणखी वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्रीय आणि राज्यस्तरीय अशा दोन्ही जीएसटी विभागांतर्फे करण्यात येत असलेल्या समर्पित सेवेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की या सर्वांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी महसूल संकलन, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक  कल्याण आणि महाराष्ट्र राज्य तसेच देशाच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई क्षेत्राच्या प्रधान मुख्य आयुक्त प्राची सरुप आणि महाराष्ट्राचे जीएसटी आयुक्त आशिष शर्मा यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) ज्येष्ठ अधिकारी, राज्य जीएसटी विभागाचे अधिकारी, व्यापार आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, कर व्यावसायिक तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी आजच्या कार्यक्रमात भाग घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई क्षेत्राच्या प्रधान मुख्य आयुक्त प्राची सरुप यांनी मान्यवर अतिथी आणि जीएसटी क्षेत्रातील सदस्यांचे स्वागत केले. उपस्थितांना संबोधित करताना सरुप यांनी आर्थिक वर्ष 2025-26मध्ये मुंबई विभागाने केलेल्या कामगिरीवर अधिक प्रकाश टाकला. तसेच त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील जीएसटी महसूल संकलनात झालेली उत्कृष्ट वाढ अधोरेखित केली. या वाढीतून अर्थव्यवस्थेची लवचिकता, सुधारित स्वयंस्फुर्त नियमपालन, परिणामकारकतेने करदात्यांशी संपर्क साधण्यासाठी आयोजित कार्यक्रम आणि डेटा- आधारित प्रशासन यांचे दर्शन घडते यावर त्यांनी अधिक भर दिला.

करदात्याला देण्यात येणाऱ्या सेवांच्या वेगवान कार्यवाहीच्या माध्यमातून व्यापार आणि उद्योग सुलभतेने होण्यासाठी विभागातर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी अधिक प्रकाश टाकला. पारदर्शकतेमध्ये लक्षणीय वाढ करत, करांचा साखळी परिणाम कमी करत आणि एकसमान राष्ट्रीय बाजारपेठेची उभारणी करत जीएसटी ही देशातील एक सर्वात यशस्वी कर सुधारणा म्हणून उदयाला आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. जीएसटी परिषद ही सर्वसंमतीवर आधारित धोरण निर्मितीचा एक यशस्वी नमुना म्हणून विकसित झाली आहे असे सांगत महाराष्ट्राचे जीएसटी आयुक्त आशिष शर्मा यांनी करदात्यांसाठी जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण, सुलभीकृत नियमपालन आणि वेगवान, तंत्रज्ञान-चलित परतावे यांच्यासह आणखी सुधारणांसाठी आवाहन केले. सुमारे 90 टक्के करदाते नियमांचे पालन करतात यावर अधिक भर देत ते म्हणाले की, कर प्रशासन आणखी कार्यक्षम आणि करदाता-स्नेही स्वरूपाचे करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.

समर्पित आणि प्रशंसनीय सेवा दिल्याबद्दल आणि कर प्रशासनात उत्कृष्टतेला चालना दिल्याबद्दल विभागातील उत्कृष्ट अधिकाऱ्यांना या प्रसंगी प्रशंसा प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान मुंबई क्षेत्रीय विभागाने केलेली कामगिरी, करदात्यांसाठी सुलभता निर्माण करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेले उपक्रम, डिजिटल प्रशासकीय उपाययोजना आणि जीएसटी अंमलबजावणीसाठी स्वीकारण्यात आलेल्या सर्वोत्तम पद्धती याविषयी माहिती देणारी सादरीकरणे करण्यात आली.

करदाते, व्यापारी संघटना, कर व्यावसायिक, राज्य जीएसटी अधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्यासह जीएसटी क्षेत्रातील सर्व भागधारकांनी जीएसटीच्या यशासाठी सतत दिलेला पाठींबा आणि योगदान यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आभारप्रदर्शनासह हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280099) आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English