सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून 20वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा


'प्रशासकीय डेटाची क्षमता उलगडणे' ही यावर्षीची संकल्पना

Posted On: 30 JUN 2026 2:40PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जून 2026

 

भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने (क्षेत्रीय कार्यसंचालन विभाग), 29 जून 2026 रोजी मुंबईतील फोर्ट येथील फादर पॅलेशियस सभागृहात 20वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला. हा कार्यक्रम सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. भारतातील आधुनिक सांख्यिकीचे प्रणेते आणि देशाच्या अधिकृत सांख्यिकी प्रणालीचे शिल्पकार प्रा. पी. सी. महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला.

या वर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची संकल्पना, "प्रशासकीय डेटाची क्षमता उलगडणे," अशी होती. पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती, प्रभावी प्रशासन तसेच सामाजिक-आर्थिक नियोजनामध्ये प्रशासकीय डेटाचे वाढते महत्त्व या संकल्पनेतून अधोरेखित होते. या कार्यक्रमात भारताची अधिकृत सांख्यिकी प्रणाली मजबूत करण्यात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस) आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही प्रकाश टाकण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जनगणना कार्य संचालनालय, मुंबई च्या संचालक डॉ. निरुपमा जे. डांगे (आयएएस) तर सन्माननीय पाहुणे म्हणून राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी कार्यकारी संचालक डॉ. आर. बी. बर्मन उपस्थित होते. उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, मुंबई च्या उपमहासंचालक पी. ए. मिनी, मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. करुणा गोकर्णा आणि विदेशी व्यापार महासंचालक कार्यालय, मुंबई चे संचालक आलोक कुमार यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात मुंबईतील विविध महाविद्यालये आणि संस्थांमधील विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (क्षेत्रीय कार्य संचालन विभाग), प्रादेशिक कार्यालय, मुंबई येथील शंभराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डॉ. निरुपमा जे. डांगे (आयएएस) यांनी आपल्या प्रमुख भाषणात, पुरावा-आधारित शासन आणि सार्वजनिक धोरण निर्मितीमध्ये प्रशासकीय माहितीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रशासकीय माहिती आणि जनगणना माहिती या दोन्हींची परस्पर पूरक भूमिका स्पष्ट करताना सरकारी कार्यक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी अधिकृत माहिती संकलन कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. दर्जेदार माहिती ही प्रभावी धोरणनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाचा पाया आहे, असे त्यांनी सांगितले.

उपस्थितांना संबोधित करताना एनएसओच्या उपमहासंचालक पी. ए. मिनी यांनी प्रा. पी. सी. महालनोबिस यांच्या कार्याला आदरांजली वाहिली. तसेच भारताच्या सांख्यिकीय संस्था आणि वैज्ञानिक सांख्यिकीय आराखडा तयार करण्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांचे योगदान आजही देशाच्या अधिकृत सांख्यिकीय प्रणालीला मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. आर. बी. बर्मन यांनी सुयोग्य आर्थिक नियोजन आणि शासनासाठी विश्वसनीय अधिकृत आकडेवारीच्या महत्त्वपूर्ण गरजेवर भर दिला. विकसित होत असलेल्या सांख्यिकीय परिसंस्थेमध्ये प्रशासकीय माहितीची वाढती प्रासंगिकता त्यांनी अधोरेखित केली तसेच माहितीची गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचे सर्वोच्च मापदंड जपण्याच्या गरजेवर भर दिला.

मुंबई येथील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एफओडी) उपसंचालिका रूपाली दशरथ कर्णे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2279336) अभ्यागत कक्ष : 70
Read this releasein: English