कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री राम नाथ ठाकूर यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कृषी सुविधांना भेट दिली
जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा – केंद्रीय राज्यमंत्री राम नाथ ठाकूर
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2026 4:47PM by PIB Mumbai
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री राम नाथ ठाकूर यांनी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी आणि शाश्वत कृषी विकासाची खात्री करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. ते आज बारामती येथे खेत बचाव अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि आयसीएआर-एटीएआरआय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी आयसीएआर- एटीएआरआय, पुण्याचे संचालक डॉ. एस. के. रॉय, एटीएमए अर्थात आत्मा, महाराष्ट्रचे संचालक सुनील बोरकर, एनआयएएसएम, बारामतीचे संचालक डॉ. सम्मी रेड्डी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. के. ससाणे, कृषी मंत्रालयाच्या विपणन आणि निरीक्षण संचालनालयाचे डॉ. एन. पी. सिंग आणि डॉ. अजय उपाध्याय, तसेच कृषी विद्यान केंद्र बारामतीचे विश्वस्त रणजित पवार उपस्थित होते.

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान, मंत्र्यांनी प्रगत कृषी सुविधांची पाहणी केली, यावेळी संशोधकांनी ऊस आणि केळीच्या लागवडीसाठी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित मॉडेल्सचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने स्थापन केलेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता केंद्रालाही भेट दिली आणि शेतीची उत्पादकता व पीक व्यवस्थापन सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घेतला.
मंत्र्यांनी जीवामृतची (नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केव्हीके बारामतीने विकसित केलेले आणि प्रसार केलेले सेंद्रिय द्रावण) निर्मिती आणि वापराचीही पाहणी केली. शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याबाबत केव्हीकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
उपस्थितांना संबोधित करताना, राम नाथ ठाकूर यांनी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा खालावलेला दर्जा याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशभरात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

जमिनीच्या उत्तम आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक शेतीवर भर द्यावा. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता सुधारते, कालांतराने पिकांचे उत्पादन वाढते आणि सुरक्षित व पौष्टिक अन्ननिर्मितीस मदत होते, असे मंत्र्यांनी सांगितले. भावी पिढ्यांचे हित आणि पर्यावरणाचे शाश्वत रक्षण यांसाठी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी, रामनाथ ठाकूर यांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वितरित केल्या आणि नैसर्गिक शेतीच्या नाविन्यपूर्ण पद्धती यशस्वीपणे अंमलात आणणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव केला. शाश्वत शेतीला चालना देण्यातील त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आणि इतर शेतकऱ्यांना त्यांच्या अनुभवांतून शिकण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी, संशोधक आणि प्रमुख कृषी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2278450)
आगंतुक पटल : 79
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English