अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भंडारामध्ये भारतीय रिझर्व बँकेच्या 'व्हीएसटीईएम' उपक्रमासह आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन साजरा

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2026 3:48PM by PIB Mumbai


आंतरराष्ट्रीय एमएसएमई (सूक्ष्म लघु मध्यम उद्योग) दिनाचे औचित्य साधून, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या  नागपूर प्रादेशिक कार्यालयाने 25 जून 2026 रोजी भंडारा येथे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. विदर्भातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने 'व्हीएसटीईएम' (विदर्भ स्पेसिफिक ट्रेनिंग फॉर एम्पॉवरिंग एमएसएमईज) या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी 27 जून हा दिवस जागतिक स्तरावर 'आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिन' म्हणून साजरा केला जातो.

या वर्षीच्या कार्यशाळेसाठी "कौशल्य विकास, बाजारपेठ उपलब्धता आणि सुयोग्य वित्तीय व्यवस्थापनाच्या माध्यमातून सक्षम आणि लवचिक उद्योग उभारणे"  ही मध्यवर्ती संकल्पना  निश्चित करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यातील 180 हून अधिक आकांक्षी आणि विद्यमान उद्योजकांनी या कार्यक्रमात अत्यंत उत्साहाने भाग घेतला.

या कार्यक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँक, नागपूरचे प्रादेशिक संचालक सचिन वाय. शेंडे; रिझर्व्ह बँक नागपूरच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाच्या (एफआयडीडी) उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ; बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक अरुप पात्रा यांच्यासह भंडारा जिल्हा उद्योग केंद्र आणि नाबार्डचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या परिसरातील आघाडीच्या बँकांच्या प्रतिनिधींनीही यात सक्रिय सहभाग नोंदवत, एमएसएमई कर्ज योजनांची माहिती देणारे स्वतंत्र स्टॉल्स उभारले होते. याशिवाय, जिल्ह्यातील उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांनी  प्रदर्शनाच्या स्टॉल्सच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे सादरीकरण केले.

उद्योजकांची क्षमता बांधणी, उद्योगांचे औपचारिकीकरण आणि कर्ज पुरवठा तसेच कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहातील वित्तीय व्यवस्थेशी जोडणे अत्यंत आवश्यक आहे, यावर सचिन वाय. शेंडे, प्रादेशिक संचालक, आरबीआय (नागपूर) यांनी उपस्थितांना संबोधित करताना भर दिला.उपस्थित सर्व सदस्यांनी या चर्चासत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, आपल्या शंकांचे आणि समस्यांचे निरसन करून घ्यावे आणि उद्योगांच्या वाढीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संस्थात्मक साहाय्य प्रणालींचा पुरेपूर लाभ उठवावा, असे आवाहनही सचिन शेंडे यांनी यावेळी केले.

या प्रसंगी बोलताना रिझर्व्ह बँकेच्या उपमहाव्यवस्थापक अंजना श्यामनाथ यांनी दैनंदिन जीवनातील काही प्रत्यक्ष उदाहरणे देत, जिल्हा पातळीवर आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि उद्योजकता वाढीसाठी एमएसएमई क्षेत्र बजावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्या म्हणाल्या की, रिझर्व्ह बँकेच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने या 'व्हीएसटीईएम' कार्यक्रमाची संकल्पना विशेषतः विदर्भ क्षेत्रातील संधी आणि आव्हानांचा विचार करून तयार केली आहे, जेणेकरून सर्व भागधारकांमध्ये  योग्य समन्वय साधून एमएसएमई परिसंस्थेला अधिक बळकटी देता येईल.

या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी उद्योजकांना, एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने राबवलेले विविध उपक्रम, सरकारच्या कल्याणकारक योजना, विपणनाचे विविध मार्ग, संस्थात्मक पतपुरवठा आणि निर्यातीच्या संधी याविषयी सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.  संवादात्मक चर्चा आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने या कार्यशाळेचा समारोप झाला. उपस्थित सर्व उद्योजकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

***

सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278429) आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English