अर्थ मंत्रालय
डीआरआयच्या नागपूर प्रादेशिक युनिटने वन्यजीवांची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस आणले
Posted On:
26 JUN 2026 10:41AM by PIB Mumbai
मुंबई विभागीय युनिटच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय ) नागपूर प्रादेशिक युनिटने 24 आणि 25 जून 2026 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करणारे एक रॅकेट यशस्वीरीत्या उघडकीस आणले. हे रॅकेट मलबार जायंट स्क्विरल (Ratufa indica), इंडियन स्टार टोरटोईज (Geochelone elegans), रानकोंबडा (Jungle Fowl) आणि स्मॉल इंडियन सिव्हेट (Viverricula indica) यांच्या अवैध व्यापारात सहभागी होते.



या मोहिमेदरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांनी श्रीकाकुलम शहरात एका संशयित व्यक्तीला अडवले आणि पिंजऱ्यात बंद ठेवलेल्या अवस्थेत असलेल्या चार मलबार जायंट स्क्विरल्स , एक इंडियन स्टार टोरटोईज आणि चौदा जंगली कोंबड्यांची सुटका केली. त्यानंतरच्या तपासात डीआरआयचे पथक श्रीकाकुलमपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायकुरडी गावातील एका दुर्गम ठिकाणी पोहचले. खडतर भूप्रदेश, वीजपुरवठ्याचा अभाव आणि मोबाईल नेटवर्कची अनुपलब्धता अशा आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू ठेवली आणि त्या ठिकाणाहून 'स्मॉल इंडियन सिव्हेट'च्या दोन पिल्लांची सुटका केली.
मलबार जायंट स्क्विरल, स्मॉल इंडियन सिव्हेट आणि इंडियन स्टार टोरटोईज यांचा समावेश 'वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 ' च्या अनुसूची-1 मध्ये करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत त्यांची शिकार, बाळगणे, वाहतूक आणि व्यापार करण्यास मनाई करून त्यांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. त्यानुसार, जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांना 'वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 ' च्या तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले.
जप्तीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, ताब्यात घेतलेली व्यक्ती आणि सुटका केलेले प्राणी यांना 'वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972' मधील संबंधित तरतुदींनुसार पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी श्रीकाकुलम वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या या वन्यजीव प्रजाती अनेकदा अवैध तस्करांचे लक्ष्य ठरतात, याला कारण 'एक्झॉटिक पेट' (परदेशी पाळीव प्राणी) चा व्यापार आणि वन्यजीव संग्राहकांकडून असलेली मोठी मागणी हे आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यापारामुळे जैवविविधतेला आणि नैसर्गिक अधिवासातील या संरक्षित प्रजातींच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण होतो.
डीआरआयच्या सातत्यपूर्ण कामगिरीवरून दिसून येते की ते राज्य वन विभाग आणि इतर अंमलबजावणी संस्थांच्या समन्वयाने, गोपनीय माहितीच्या आधारे वन्यजीवांच्या बेकायदेशीर तस्करीच्या जाळ्यांविरुद्ध कारवाई करून वन्यजीव संरक्षणाप्रती निरंतर सतर्क आणि कटिबद्ध आहेत.
डीआरआयने जनतेला सतर्क राहण्याचे आणि वन्यजीवांचा बेकायदेशीर व्यापार किंवा तस्करी यांबाबत कोणतीही विशिष्ट माहिती कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत सामायिक करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी आणि वन्यजीव संदर्भातल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनतेचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
***
निलिमा चितळे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2278254)
अभ्यागत कक्ष : 39