परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयात,पारपत्र सेवा दिवस 2026 साजरा

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2026 4:17PM by PIB Mumbai

पुणे, 25 जून 2026

पुण्याच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयात पारपत्र सेवा दिवस 2026, साजरा करण्यात आला. नागरिकांना, कार्यक्षम, सुरक्षित, पारदर्शक आणि नागरिक केंद्री पारपत्र सेवा देण्यासाठीची कटिबद्धता यावेळी व्यक्त करण्यात आली.

24 जून 1967 या दिवशी देशात, पारपत्र कायदा लागू करण्यात आला होता, पारपत्र जारी करणे आणि त्याच्याशी संबंधित कामांचा शुभारंभ या कायद्यामुळे झाला.  त्या निमित्ताने, दरवर्षी 24 जून रोजी, पारपत्र सेवा दिवस साजरा केला जातो.

पारपत्र सेवा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांत, पारपत्र सेवा अधिक सुलभ करुन, त्या अधिक सहज, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, ई- पासपोर्ट, पासपोर्ट सेवा मोबाईल व्हॅन्स, तसेच पारपत्र सेवा केंद्रांचे विस्तृत जाळे, अशा सर्व उपाययोजनांमुळे,  देशभरातील नागरिकांना पारपत्र मिळणे सोपे झाले आहे.

गेल्या दहा वर्षात, पारपत्र सेवा व्यवस्थेचा विस्तार लक्षणीयरीत्या झाला आहे. 2014 मध्ये देशात 77 पासपोर्ट सेवा केंद्रे होती, तर आज पारपत्र सेवा केंद्रे आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्रे मिळून त्यांची संख्या 545 पर्यंत पोहोचली आहे. यामुळे दुर्गम आणि वंचित भागांतील नागरिकांपर्यंतही पारपत्र सेवा पोहोचू शकल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय आणि टपाल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पासपोर्ट सेवा नागरिकांच्या अधिक जवळ आल्या असून, पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर झाली आहे.

पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने, सेवा वितरण अधिक प्रभावी व सुलभ करण्यासाठी अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यालय नियमितपणे ‘ओपन हाऊस’चे आयोजन करते. तसेच, पारपत्र सेवा नागरिकांना सहज उपलब्ध असाव्यात यासाठी मोबाईल पासपोर्ट व्हॅन्स सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय, पारपत्र प्रक्रिया आणि वेळेत पडताळणी सुलभ व्हावी यासाठी पोलीस अधिकारी तसेच इतर संबंधित घटकांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

पारपत्र सेवा दिवसाच्या निमित्ताने, पुणे प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि कल्याणाबाबतची आपली बांधिलकी अधोरेखित करत, कार्यालयात, निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देण्यात आली.

जनसंपर्क आणि जनजागृती उपक्रम तसेच डिजिटल उपाययोजनांचा अवलंब करून, पारपत्र सेवा अधिक सक्षम करण्यासाठी, पुणे प्रादेशिक पारपत्र कार्यालय कटिबद्ध आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना वेळेत, सुरक्षित आणि विनासायास पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, पारपत्र सेवा केंद्रे आणि टपाल कार्यालये, पारपत्र सेवा केंद्रांच्या विस्तृत जाळ्याद्वारे सातत्याने कार्यरत आहेत.

पारपत्र सेवा दिनानिमित्त, प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने, नागरिक, पोलिस अधिकारी, भारतीय टपाल विभाग, सेवा प्रदाते आणि पारपत्र सेवा व्यवस्थेशी निगडीत सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच, जन सेवांचा उच्च दर्जा कायम राखत, अत्यंत जलद, सुरक्षित, पारदर्शक आणि विनासायास सेवा देण्याबद्दलची आपली कटिबद्धताही व्यक्त केली.


निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2277789) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English