रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाशिकच्या उन्नत मार्गिकांच्या संकल्पनाधारित सुशोभीकरणाद्वारे योगविषयक जनजागृतीला दिली चालना
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2026 5:49PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नाशिक शहरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 वरील सहापदरी पिंपळगाव-नाशिक-गोंदे टप्प्यावर बळी महाराज मंदिर चौकात एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या भागातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये स्वास्थ्य, निरोगी जीवनशैली आणि योगविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शहराच्या उन्नत मार्गिकांच्या स्तंभांवर योग या संकल्पनेवर आधारित चित्रे चितारुन योगाभ्यासाला चालना देण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे.

एनएचएआयने नाशिक शहरात 10 किमी लांबीची प्रमुख उन्नत मार्गिका उभारली असून ही मार्गिका शहरी वाहतूकीचा महत्त्वाचा मार्ग म्हणून काम करते. या उन्नत मार्गिकेच्या खाली असलेल्या रस्त्यावर दिवसा लक्षणीय प्रमाणात वाहतूक असते आणि आगामी कुंभ मेळ्याच्या काळात नाशिकला मोठ्या प्रमाणात भेट देणारे भाविक या रस्त्याचा वापर करतील अशी अपेक्षा आहे.
शहराच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून, एनएचएआयने विविध संकल्पना सादर करणाऱ्या रंगीबेरंगी चित्रांचा समावेश असलेल्या ग्राफिक फिल्म रॅपिंगचा वापर करून उन्नत मार्गिकेच्या स्तंभांचा कायापालट केला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विचार करून यापैकी 15 स्तंभ योगाच्या विविध संकल्पनांना समर्पित केले आहेत. या कलाकृतींमधून वेगवेगळी योगासने तसेच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि संतुलित जीवनशैली यांना चालना देणाऱ्या संदेशांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
योगाच्या संदेशाला पारंपरिक मंचाच्या पलीकडे घेऊन जाणे आणि हा संदेश दैनंदिन वापराच्या सार्वजनिक जागांमध्ये समाविष्ट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. दिसायला अत्यंत आकर्षक अशा या चित्रांच्या माध्यमातून, प्रवासी, स्थानिक रहिवासी आणि अभ्यागतांना योगाभ्यास करण्यासाठी आणि त्यातून एकंदर आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक लाभ मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा एनएचएआयचा प्रयत्न आहे.
मार्गिकेचा दृश्य आकर्षकपणा वाढवण्यासोबतच, सामाजिक जागरुकता आणि सकारात्मक सामुदायिक सहभाग यांना चालना देण्यासाठी सार्वजनिक पायाभूत सुविधांचा कशा प्रकारे वापर करता येऊ शकतो हे देखील हा उपक्रम अधोरेखित करतो.

***
शैलेश पाटील/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2275498)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English