श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमारे 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे होणार वितरण, पुण्यात चार ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन


पहिल्यांदाच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळणार

Posted On: 18 JUN 2026 11:44AM by PIB Mumbai

पुणे, 18 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (शुक्रवार, दिनांक 19 जून) पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत (पीएम-व्हीबीआरवाय) 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन रकमेचे  वितरण करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून भारतभर सुमारे 200 ठिकाणी विशेषतः प्रमुख औद्योगिक आणि रोजगार केंद्रे असलेल्या भागात, प्रादेशिक स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पुण्यातील चार ठिकाणांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे, पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही (live streaming) येथून केले जाईल, अशी माहिती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), पुणे विभागाकडून देण्यात आली. 

या कार्यक्रमांमध्ये नियोक्ते, कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांचा सहभाग असेल. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, नियोक्ते नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना औपचारिकपणे नियुक्तीपत्रे प्रदान करतील; हे कृती रोजगार निर्मितीला चालना देण्यात आणि तरुण कामगारांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यात या योजनेची भूमिका दर्शवेल, असे त्यांनी सांगितले.

19 जून 2026 रोजी दुपारी 3.30 वाजल्यापासून खालील ठिकाणी पुणे येथील चार प्रादेशिक कार्यालयांद्वारे हे कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील:

  1. प्रादेशिक कार्यालय, पुणे कँटोन्मेंट - ठिकाण - स्वामी विवेकानंद हॉल, एमआयटी (MIT) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पौड रोड, कोथरूड, पुणे 411038
  2. प्रादेशिक कार्यालय, पुणे आकुर्डी - ठिकाण - क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर, प्लॉट क्र. J/P, 10, टेल्को भोसरी रोड, गणेश नगर, एमआयडीसी (MIDC), भोसरी, पुणे, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411026
  3. प्रादेशिक कार्यालय, पुणे हिंजवडी - ठिकाण - जेएसपीएम (JSPM) राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तथावडे, 'सी' (C) बिल्डिंग, तिसरा मजला - सभागृह, पिंपरी-चिंचवड, पुणे 411033
  4. प्रादेशिक कार्यालय, पुणे विमान नगर - ठिकाण - एमआयटी (MIT) आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, राज बाग कॅम्पस, पुणे-सोलापूर महामार्ग, भारत पेट्रोल पंपाशेजारी, लोणी काळभोर, पुणे - 411021

भारत सरकारने 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' (PMVBRY) सुरू केली आहे. ही योजना पूर्वी 'एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह' (ELI) योजना म्हणून ओळखली जात होती. अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये  विशेषतः उत्पादन क्षेत्रावर विशेष भर देऊन रोजगार निर्मितीला चालना देणे, रोजगारक्षमता वाढवणे आणि सामाजिक सुरक्षा व्याप्तीचा विस्तार करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत, पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन (15,000 रुपयांपर्यंत) मिळेल; तसेच, अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या नियोक्त्यांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रोत्साहन दिले जाईल आणि उत्पादन क्षेत्रासाठी यात आणखी दोन वर्षांच्या अतिरिक्त लाभांची तरतूद असेल.
99446 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीसह, 'पीएमव्हीबीआरवाय' (PMVBRY) योजनेचे उद्दिष्ट दोन वर्षांच्या कालावधीत देशभरात 3.5 कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्यास मदत करणे हे आहे. यापैकी सुमारे 1.92 कोटी लाभार्थी हे औपचारिक रोजगार क्षेत्रात नव्याने प्रवेश करणारे असतील अशी अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत निर्माण झालेल्या रोजगारांसाठी लागू असतील.

या योजनेचे दोन भाग आहेत:

भाग अ – प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन:

या भागांतर्गत, EPFO कडे नोंदणीकृत असलेले आणि दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळवणारे, प्रथमच नोकरीवर रुजू झालेले कर्मचारी एका महिन्याच्या वेतनाइतके (जास्तीत जास्त 15000 रुपयांपर्यंत) प्रोत्साहनपर अनुदान दोन हप्त्यांमध्ये मिळण्यास पात्र आहेत. पहिला हप्ता सलग सहा महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर दिला जातो, तर दुसरा हप्ता बारा महिन्यांची सेवा आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर दिला जातो. तरुण कामगारांमध्ये दीर्घकालीन बचतीची सवय वाढीस लागावी यासाठी, या प्रोत्साहनपर अनुदानाचा काही भाग ठराविक कालावधीसाठी बचत साधन किंवा ठेव खात्यात राखून ठेवला जातो.

भाग ब – नियोक्त्यांना (मालकांना) सहाय्य:

हा भाग सर्व क्षेत्रांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रोत्साहन देतो. संबंधित कर्मचारी किमान सहा महिने सतत नोकरीवर राहिल्यास, नियोक्त्यांना प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यामागे दरमहा 3000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दोन वर्षांच्या कालावधीसाठी मिळेल. उत्पादन क्षेत्रासाठी, हे प्रोत्साहन आणखी दोन वर्षांसाठी (म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या वर्षासाठीही) वाढवून दिले जाते. यासाठी पात्र ठरण्याकरिता, EPFO कडे नोंदणीकृत आस्थापनांनी किमान दोन अतिरिक्त कर्मचारी (50 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी) किंवा पाच अतिरिक्त कर्मचारी (50 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांसाठी) नियुक्त करणे आवश्यक आहे.

'भाग अ' (Part A) अंतर्गत पहिल्यांदाच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्व देयके 'आधार ब्रिज पेमेंट सिस्टम' (ABPS) द्वारे 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर' (DBT) द्वारे केली जातात; तर 'भाग ब' (Part B) अंतर्गत नियोक्त्यांना (मालकांना) मिळणारे प्रोत्साहनपर लाभ थेट त्यांच्या पॅन (PAN) कार्डशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातात.

PMVBRY योजनेमुळे विशेषतः उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या निर्मितीला चालना मिळण्याची आणि तरुणांचा औपचारिक कार्यबलातील (formal workforce) सहभाग वाढण्याची अपेक्षा आहे. ही योजना देशभरातील लाखो कामगारांसाठी रोजगार औपचारिक करण्याच्या आणि सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान देईल.

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनिमित्त, 19 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या विशेष उपस्थितीत PMVBRY चा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमादरम्यान, योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अंदाजे 2400 कोटी रुपयांचे लाभ वितरित केले जातील.

 

* * *

पीआयबी पुणे | हर्षल आकुडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2274415) अभ्यागत कक्ष : 137
Read this releasein: English