अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुसुरक्षेच्या मुद्द्यावर अणुऊर्जा नियामक मंडळाच्या वतीने या क्षेत्रातील संभाव्य उद्योगजकांसाठी एक दिवसीय चर्चात्मक परिषदेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 16 JUN 2026 7:00PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2026

अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB - Atomic Energy Regulatory Board) 11 जून 2026 रोजी मुंबईतील नियामक भवन संकुलात एक दिवसीय चर्चा परिषदेचे आयोजन केले होते. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संभाव्य सहभागींना अणुऊर्जा क्षेत्रातील नेतृत्व, व्यवस्थापन आणि सुरक्षा विषयक संस्कृतीच्या सिद्धांतांची माहिती करून देणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

नुकत्याच लागू करण्यात आलेल्या शांती कायद्यांतर्गत (SHANTI Act - SHANTI Act, 2025) अणुऊर्जा प्रकल्पांची उभारणी, मालकी, कार्यान्वयन आणि ते बंद करण्याच्या (डीकमिशनिंग) प्रक्रियेत भारतातील खाजगी कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांच्या सहभागाची तरतूद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरच या चर्चात्मक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अणुऊर्जा क्षेत्रात रस असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांमधील सुमारे 30 प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी उपस्थितांशी संवाद साधला. अणुऊर्जेशी संबंधित उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये प्रभावी नेतृत्व, व्यवस्थापनाची भक्कम प्रणाली आणि दृढ सुरक्षा विषयक संस्कृती जेपासली जात असेल, तरच अणुऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्टता साध्य केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. हे सिद्धांत पारंपरिक उद्योगांसाठी देखील तितकेच लागू असले, तरी अणुऊर्जा प्रकल्पांच्या संपूर्ण कार्यचक्रात आणि सर्व कार्यान्वयनाशी संबंधित सर्व टप्प्यांवर त्यांचा नियोजनबद्ध तसेच सर्वंकष उपयोग करून घेणे आवश्यक असते, आणि हेच अणुऊर्जा क्षेत्राचे वेगळेपण आहे, असे त्यांनी सांगितले.

अणुउद्योग क्षेत्रातील सुरक्षा संस्कृती म्हणजे केवळ नियामक अनिवार्यता नाही, तर ते या क्षेत्राच्या गाभ्याशी जोडलेले महत्वाचे सामायिक मूल्य आहे, आणि  या क्षेत्राचे नेतृत्व करणार्‍यांनी, व्यवस्थापकांनी तसेच कामगार या सर्वांनीच सातत्यपूर्णतेने या मूल्याची जोपासना केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. या सुरक्षा संस्कृतीच्या महत्त्वाकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. या  परिषदेत वरिष्ठ नियामकांनी अणुसुरक्षेची मूलभूत तत्त्वे, सुरक्षेसाठी नेतृत्व आणि व्यवस्थापन तसेच सुरक्षा संस्कृती या विषयांवर सादरीकरणे केली. यानंतर उपस्थितांमधील परस्पर संवादाचे सत्रही पार पडले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अणुऊर्जा क्षेत्रात नव्याने पाऊल टाकत असलेल्या संस्थांना कोणत्या आव्हानांना आणि समस्यांचा सामना करावा लागत आहे, याबद्दल अणुऊर्जा नियामक मंडळालाही मोलाची माहिती मिळाली. यासोबतच या परिषदेमुळे या उद्योग क्षेत्रातील भागधारक आणि नियामक संस्था यांच्यात सातत्यपूर्ण सहभाग आणि भविष्यातील देवाणघेवाणीसाठीचा मार्गही प्रशस्त झाला आहे.

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2273705) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English