युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत येत्या 15 ते 17 जून 2026 दरम्यान विकसित भारत युवा संसद 2026 चे आयोजन


युवा नेतृत्वाखालील राष्ट्र उभारणी आणि प्रशासनासंबधी एक ऐतिहासिक क्षण

प्रविष्टि तिथि: 14 JUN 2026 8:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने येत्या 15 ते 17 जून 2026 या दरम्यान विकसित भारत युवा संसद 2026 चे  आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली, माय भारत  या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून नवी दिल्लीत हे आयोजन केले जाईल. या उपक्रमांच्या या आधीच्या आवृत्त्यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या यंदा लोकशाही प्रक्रियांमधील युवा वर्गाच्या सहभागाबद्दल नव्याने कल्पना मांडण्यात आली आहे. हा उपक्रम युवा वर्गाला प्रशासन, धोरणात्मक चर्चा आणि संसदीय कामकाज प्रत्यक्ष समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देतो.

नवी दिल्लीतील संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात येत्या 16 जून 2026 रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या विकसित भारत युवा संसदेचे उद्घाटन केले जाईल. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे देखील यावेळी उपस्थित असतील.

यंदा या कार्यक्रमाच्या आयोजनाची विभागणी तीन प्रगतीशील टप्प्यांच्या स्वरुपात केली गेली आहे. युवा वर्गाचा सहभाग अधिक दृढ करण्याच्या अनुषंगाने प्रत्येक टप्प्याची आखणी केली गेली आहे.

जिल्हा समन्वय फेऱ्या (District Nodal Rounds):

• आणीबाणीची 50 वर्षे : भारतीय लोकशाहीला मिळालेली शिकवण या विषयावर देशभरातील 757 समन्वयक विद्यापीठे आणि संस्थांमध्ये व्यापक चर्चा करण्यात आल्या. या माध्यमातून हा संवाद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात आला.

• प्रत्येक जिल्ह्यामधील सवोत्कृष्ट 5 सहभागींना राज्य पातळीवरील टप्प्यात भाग घेण्याची संधी मिळाली.

राज्य पातळीवरील फेऱ्या (State Rounds):

• सर्व राज्यांमधील विधानसभा आणि प्रमुख सरकारी ठिकाणांवर हे टप्पे आयोजित करण्यात आले होते. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 : युवा शक्तीने प्रेरित अर्थसंकल्प हा या टप्प्याअंतर्गतचा विषय होता. या टप्प्यांमधून युवा वर्गाला प्रादेशिक प्रशासकीय व्यवस्थेबद्दल थोडक्यात पण अर्थपूर्णरित्या समजून घेता आले.

• याअंतर्गत असलेली सत्रे राज्यांचे विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. यामुळे सार्वजनिक चर्चांमधील युवा वर्गाच्या अभिव्यक्तीचे महत्व अधिक वाढले.

राष्ट्रीय फेरी (15-17 जून 2026):

• सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रतिनिधी भव्य अंतिम फेरीसाठी नवी दिल्लीत एकत्र येतील.

• राष्ट्रीय फेरीत विविध उपक्रमांचा समावेश असेल:

• उद्घाटनपर भाषण: प्रत्येक संघातील एक प्रतिनिधी 'नारी शक्ती वंदन: सर्वसमावेशकतेला चालना' आणि 'विकसित भारत 2047' या विषयांवर प्रत्येकी 3 मिनिटे बोलून सभागृहाला संबोधित करेल.

• प्रश्नोत्तरांचा तास: खऱ्या संसदीय परंपरेनुसार प्रत्येक संघ इतर संघांना प्रश्न विचारतील आणि त्यांना उत्तरे देतील. प्रश्न विचारण्यासाठी 3 मिनिटे, उत्तर देण्यासाठी 3 मिनिटे वेळ दिला जाईल. आणि यातून सामूहिक ठराव तयार केला जाईल.

• मास्टरक्लास: एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वक्तृत्व आणि सार्वजनिक भाषण कलेवर एक मास्टरक्लास घेईल, ज्यामुळे सहभागी तरुणांचे नेतृत्वगुण अधिक धारदार होतील.

• पंतप्रधान संग्रहालय भेट: प्रतिनिधी पंतप्रधान संग्रहालयाच्या विशेष भेटीद्वारे भारताचा समृद्ध राजकीय वारसा आणि नेतृत्वाची परंपरा जाणून घेतील.

• नवीन संसद भवनाला भेट: भारताच्या नवीन संसद भवनाची एक प्रेरणादायी सफर आयोजित केली जाईल जी सहभागींना देशाच्या लोकशाहीच्या केंद्राशी थेट संबंध जोडण्याची संधी प्रदान करेल.

• पुरस्कार सोहळा: 17 जून रोजी 'विकसित भारत युवा संसद 2026' पुरस्कार प्रदान केले जातील. या पुरस्काराद्वारे तरुण सहभागींच्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला जाईल.

विकसित भारत युवा संसद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ती एक चळवळ आहे, जी भारतातील तरुणांची ऊर्जा, नवोन्मेष आणि आकांक्षांना राष्ट्रीय संवादाशी जोडते. केंद्रीय सभागृहात मांडले जाणारे ठराव या तीन दिवसांच्या कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता तरुण नेत्यांच्या एका पिढीला 'विकसित भारत 2047' च्या प्रवासाची जबाबदारी घेण्यास प्रेरित करतील.

***

शैलेश पाटील/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2272800) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English