रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर शहरात गेल्या 12 वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे; 25 लाख वृक्ष लागवडीद्वारे ‘हरित नागपूर’ घडविण्याचा संकल्प : नितीन गडकरी


केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत माहिती

प्रविष्टि तिथि: 13 JUN 2026 3:13PM by PIB Mumbai

नागपूर, 13 जून 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यात 25 लाख वृक्षांची लागवड करून नागपूरला ‘हरित शहर’ बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाअंतर्गत शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि इतर भागधारकांना 2 ते 3 मीटर उंचीची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

 नागपुरातील दूरसंवेदन केंद्राच्या माध्यमातून महसूल व वन विभागाच्या सहकार्याने राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांचे मॅपिंग करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाले आहे, त्यांची माहिती संकलित करून त्यांचा गौरव करण्यात येईल. अशी माहिती गडकरी यांनी दिली .

केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा आढावा घेताना गडकरी यांनी सांगितले की, गेल्या 12 वर्षांत प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 58 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. आयुष्मान भारत योजनेचे 60 कोटी लाभार्थी असून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 11 कोटी गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे 11 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक सहाय्य मिळत आहे.

रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात मुद्रा योजनेअंतर्गत 57 कोटी लाभार्थ्यांना सुमारे 35 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून त्याचा लाभ लघुउद्योजक आणि पथविक्रेत्यांना झाला आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत 1.6 लाख स्टार्टअप्स आणि 118 युनिकॉर्न उदयास आले आहेत. तसेच स्किल इंडिया मिशनअंतर्गत गेल्या 12 वर्षांत 5 कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

नागपूरमधील विकास प्रकल्पांविषयी माहिती देताना  गडकरी यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख बाजारपेठांच्या आधुनिकीकरणाची कामे सुरू असून त्यामध्ये कॉटन मार्केट पुनर्विकास प्रकल्प (टप्पा 1 व 2), इतवारी बाजार, दही बाजार, संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, कमाल चौक कमर्शियल कॉम्प्लेक्स, बुधवार बाजार, महाल पुनर्विकास प्रकल्प आणि सक्करदरा बुधवार बाजार पुनर्विकास प्रकल्पांचा समावेश आहे.

याशिवाय दाभा येथील अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर, सोक्ता भवन पुनर्विकास, मोर भवन, गणेशपेठ बसस्थानक पुनर्विकास यांसारखे महत्त्वाचे प्रकल्पही राबविण्यात येत आहेत. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून तिसऱ्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये ऑक्सिजन पार्क, बर्ड पार्क, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, ट्रिपल आयटी, बुटीबोरी येथील कर्मचारी राज्य विमा रुग्णालय, बुद्धिस्ट सर्किट योजना, दीक्षाभूमी पुनर्विकास प्रकल्प, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया केंद्र आणि मदर डेअरी प्रकल्प यांसारख्या विविध विकासकामांची माहितीही त्यांनी दिली.

रस्ते विकासासोबतच रोजगार निर्मितीवर भर देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशभरात ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सची उभारणी सुरू केली आहे. जानेवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या धोरणानुसार देशभरात 1600 प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. त्यापैकी 24 केंद्रे कार्यान्वित झाली असून 112 केंद्रांवर काम सुरू आहे. आतापर्यंत 10 लाख नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व केंद्रे कार्यान्वित झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 1.15 कोटी नागरिकांना वाहनचालक प्रशिक्षण मिळेल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

प्रस्तावित नागपूर-हैदराबाद द्रुतगती मार्गामुळे नागपूर ते हैदराबाद हे अंतर सुमारे साडेतीन तासांत पार करता येईल, असे  गडकरी यांनी नमूद केले. तसेच नागपूरमधील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून 1 ऑगस्ट 2026 रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

***

धनंजय वानखेडे/सौरभ खेकडे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272462) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil