: Mumbai, June 12, 2026
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता, जनकल्याण आणि नागरिक-केंद्रित उपक्रमांना चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, करदाता सेवा महासंचालनालयाच्या (DGTS), मुंबई विभागीय युनिटद्वारे आज अंबरनाथ येथील सीजीएचएस वेलनेस सेंटरला गरम, थंड आणि सामान्य तापमानाच्या पाण्याची सोय असलेला एक वॉटर फिल्टर आणि एक ABS ऑटोमॅटिक हँड सॅनिटायझर स्प्रे डिस्पेन्सर देण्यात आले.




अंबरनाथ येथील सीजीएचएस वेलनेस सेंटर हे मुंबई क्षेत्रातील जास्त वर्दळ असलेल्या केंद्रांपैकी एक आहे आणि येथे दररोज 500 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना सेवा दिली जाते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना जनकल्याणकारी उपक्रमांबद्दल आणि नागरिक सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी आंतर-विभागीय सहकार्य मजबूत करण्याबाबत संचालनालयाच्या वचनबद्धतेचा डीजीटीएस, मुंबई विभागीय युनिटचे प्रधान अतिरिक्त महासंचालक, सुमित कुमार यांनी पुनरुच्चार केला. स्वच्छ भारत ही केवळ एक स्वच्छता मोहीम नसून अधिक सुदृढ, स्वच्छ आणि अधिक नागरिक-स्नेही सार्वजनिक संस्था निर्माण करण्यासाठीची एक सामूहिक वचनबद्धता आहे, यावर त्यांनी भर दिला.
या सुविधांचे उद्घाटन करताना, सुमित कुमार यांनी वेलनेस सेंटरच्या उल्लेखनीय बदलाचे कौतुक केले. एका जुन्या आणि मोडकळीस आलेल्या माजी ऑर्डनन्स प्राथमिक शाळेच्या इमारतीत 2011 मध्ये स्थापन झालेल्या या केंद्राला पायाभूत सुविधांच्या गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागले होते आणि ते बंद होण्याच्या मार्गावर होते. मात्र, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मल मंडल यांच्या नेतृत्वाखाली आणि पेन्शनर्स असोसिएशनच्या पाठिंब्याने, 2017 मध्ये या केंद्राचे यशस्वीरित्या पुनरुज्जीवन आणि नूतनीकरण करण्यात आले.
26 जानेवारी 2026 रोजी वेलनेस सेंटरच्या अधिकृत भेटीदरम्यान, सुमित कुमार यांनी येथे दररोज येणाऱ्या लाभार्थ्यांची मोठी संख्या पाहिली आणि लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेच्या चांगल्या सुविधांची गरज लक्षात घेतली.
त्यानंतर, करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस), मुंबई विभागीय एकक (एमझेडयू ) यांनी रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा अधिक चांगल्या स्वरुपात देण्यासाठी आणि सार्वजनिक कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी वॉटर फिल्टर तसेच स्वयंचलित हँड सॅनिटायझर स्प्रे डिस्पेंसर उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेतला.
नव्याने बसविण्यात आलेला वॉटर फिल्टर वेलनेस सेंटरच्या समोरील कॉरिडॉरमध्ये स्थापित करण्यात आला असून, त्यामधून गरम, थंड आणि सामान्य तापमानाचे पिण्याचे पाणी उपलब्ध होते. या सुविधेमुळे केंद्राला भेट देणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सोयी-सुविधांमध्ये आणि आरामात लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. स्वच्छता राखणे आणि संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंचलित हँड सॅनिटायझर स्प्रे डिस्पेंसर देखील स्थापित करण्यात आला आहे.
उद्घाटन समारंभ फीत कापण्याच्या सोहळ्याने झाला. स्वच्छ भारत अभियानाचा आणि पर्यावरणीय शाश्वतता प्रयत्नांचा भाग म्हणून सुमित कुमार यांनी निरामयता केंद्र संकुलात वृक्षारोपण केले.
त्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात सीजीएचएस वेलनेस सेंटर तसेच अखिल भारतीय पेन्शनर्स असोसिएशन, अंबरनाथ शाखेतर्फे सुमित कुमार यांचे स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय पेन्शनर्स असोसिएशन, अंबरनाथ शाखेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सीजीएचएस वेलनेस सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मल मंडल, अखिल भारतीय पेन्शनर्स असोसिएशन, अंबरनाथ शाखेचे अध्यक्ष वेणुगोपालन नायर आणि डीजीटीएस, एमझेडयूचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सीजीएचएस वेलनेस सेंटरचे प्रतिनिधी, पेन्शनर्स असोसिएशनचे सदस्य, लाभार्थी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी डीजीटीएस, एमझेडयू यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, या सुविधांचा दररोज केंद्राला भेट देणाऱ्या मोठ्या संख्येतील निवृत्तीवेतनधारक, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
करदाता सेवा महासंचालनालय, मुंबई विभागीय एकक हे करदाता जनजागृती, संपर्क आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. सार्वजनिक सेवा, हितधारकांशी संवाद आणि समुदाय विकासाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. करदाता शिक्षण आणि सुलभीकरण या आपल्या मूलभूत जबाबदाऱ्यांपलीकडे जाऊन राष्ट्र निर्माण आणि नागरिक कल्याणासाठी असलेली संस्थेची व्यापक बांधिलकी या उपक्रमांतून प्रतिबिंबित होते.
****
अंबादास यादव/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर