सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईतर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त "अ‍ॅड्रेनालाईन साय-अ‍ॅडव्हेंचर झोन"चे अनावरण


अ‍ॅड्रेनालाईन साय-अ‍ॅडव्हेंचर: जिथे अ‍ॅड्रेनालाईन आणि उपयोजित विज्ञान यांचा संगम होतो!

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2026 10:33PM by PIB Mumbai

 मुंबई, 12 जून 2026

भारतातील विज्ञान प्रसार आणि अनुभवात्मक शिक्षणातील एक अग्रगण्य संस्था असलेले नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या विशेष मुहूर्तावर आपल्या "अ‍ॅड्रेनालाईन साय-अ‍ॅडव्हेंचर झोन"  या नवीन आकर्षणाचे उद्घाटन जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. माध्यम प्रतिनिधींनी याचे वृत्तांकन करावे, असे आमंत्रण केंद्र देत आहे. 

चिल्ड्रन्स सायन्स पार्क  मध्ये विकसित करण्यात आलेला हा साहसावर आधारित नवीन विज्ञान झोन, उत्साह, शारीरिक हालचाली आणि वैज्ञानिक शोधांचा एक अनोखा संगम आहे. शिक्षणाला एका  अविस्मरणीय अनुभवात बदलण्यासाठी रचना केलेला हा झोन, अभ्यागत, विशेषतः विद्यार्थी आणि युवा अध्ययनकर्त्यांना बायोमेकॅनिक्स, गुरुत्वाकर्षण, समतोल, गती, ऊर्जेचे रूपांतरण आणि मानवी हालचालींचे सिद्धांत प्रत्यक्ष सहभागातून समजून घेण्यास मदत करतो. ही मोहीम सर्व वयोगटातील लोकांसाठी विज्ञान शिक्षण आकर्षक, सुलभ आणि आनंददायी बनवण्याच्या केंद्राच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

उपयोजित विज्ञानाचा एक थरारक प्रवास:

अ‍ॅड्रेनालाईन साय-अ‍ॅडव्हेंचर झोन हा साहसाची वैज्ञानिक शोधांशी सांगड घालतो, ज्यामुळे अभ्यागतांना मानवी शरीर भौतिक बले आणि पर्यावरणीय परिस्थितींनुसार कशी प्रतिक्रिया व्यक्त करते याचा अनुभव घेता येतो. प्रत्येक प्रदर्शन प्रत्यक्ष व्यवहारातील वैज्ञानिक सिद्धांत दाखवण्यासाठी आणि त्याच वेळी एक थरारक व्यावहारिक अनुभव देण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले गेले आहे.

मुख्य आकर्षणे - झोन ए

1. झिप लाईनः  गुरुत्वाकर्षण जेव्हा सहभागींना लटकलेल्या वायरवरून पुढे ढकलते, तेव्हा स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेमध्ये होणारे रोमांचक रूपांतर अनुभवा. अभ्यागत एका अविस्मरणीय सफरीचा आनंद घेत असताना घर्षण, वायुगतिकी (aerodynamics), त्वरण (acceleration) आणि समतोल यांची भूमिका जाणून घेतात.

2. झिप बाईकः लटकलेल्या केबलवर सायकल चालवा आणि स्थिरता, समतोल, गुरुत्वमध्य (centre of gravity) आणि यांत्रिक कार्यक्षमतेमागील विज्ञान शिका. मानवी स्नायूंची शक्ती गतीमध्ये कशी रूपांतरित होते, याचे हे प्रदर्शन सुंदर सादरीकरण करते.

3. आऊटडोअर वॉल क्लायंबर  मानवी बायोमेकॅनिक्स, लिव्हरेज , घर्षण आणि वजनाचे वितरण यावरील हा एक व्यावहारिक धडा आहे. क्लाइंबिंग वॉलवर चढताना शरीर तरफेची प्रणाली म्हणून कसे कार्य करते, हे सहभागी येथे शिकतात.

विभाग बी

4. ह्युमन जायरो
बहु-अक्षीय फिरत्या यंत्रणेतून अंतराळवीर आणि वैमानिकांना येणाऱ्या अनुभूतीसारखा अनुभव या प्रदर्शनातून घेता येतो. या माध्यमातून कोनीय संवेग, फिरण्याची गती, अवकाशातील दिशा ओळखण्याची क्षमता आणि मानवी संतुलन प्रणालीचे कार्य समजावून सांगितले जाते.

5. 360-अंश सायकल

मानवी शक्ती गुरुत्वाकर्षणावर मात करू शकते का, याचा अनुभव देणारे हे आकर्षक प्रदर्शन आहे. सहभागी व्यक्तींना सायकल चालवत संपूर्ण उभा गोलाकार फेरा पूर्ण करण्याचे आव्हान दिले जाते. त्याचवेळी केंद्राभिमुख बल, वर्तुळाकार गती, ऊर्जा संवर्धन आणि स्नायूंची शक्ती या वैज्ञानिक संकल्पनांची सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते.

अनुभवातून विज्ञान शिक्षण

ॲड्रेनालाईन साय-ॲडव्हेंचर झोन हे केवळ एक साहसी आकर्षण नसून, अभ्यागतांना प्रत्यक्ष कृतीत वैज्ञानिक संकल्पना पाहता येतील असा एक अनुभवाधारित शैक्षणिक परिसर आहे. शारीरिक हालचाली आणि वैज्ञानिक जाण यांची सांगड घालून कुतूहल जागृत करणे, अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थी तसेच कुटुंबांमध्ये विज्ञानाबद्दल अधिक रस निर्माण करणे, हा या केंद्राचा उद्देश आहे. या नाविन्यपूर्ण प्रदर्शनांच्या उभारणीमुळे पारंपरिक वर्गखोल्यांमधील शिक्षणाच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण आणि संस्मरणीय विज्ञान शिक्षणाचे अनुभव निर्माण करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांमधील आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची नोंद झाली आहे.

मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि समाजमाध्यमांतील प्रतिनिधींना नेहरू विज्ञान केंद्राला भेट देऊन ॲड्रेनालाईन साय-ॲडव्हेंचर झोनच्या प्रात्यक्षिकाचे वार्तांकन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे विज्ञानावर आधारित या वैशिष्ट्यपूर्ण आकर्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होईल आणि विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबे तसेच विज्ञानप्रेमींना साहस आणि विज्ञान यांच्यातील रंजक संबंधाचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

 
निलीमा चितळे/शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2272369) आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English