अर्थ मंत्रालय
भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विदर्भातील एफपीओंसाठी क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 3:55PM by PIB Mumbai
नागपूर, 12 जून 2026

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने 'नाबार्ड'च्या सहकार्याने, विदर्भ प्रांतातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी (एफपीओ) क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. शाश्वत शेतीला चालना देण्यामध्ये आणि शेतकऱ्यांना बाजारपेठा, तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यामध्ये या संस्थांची भूमिका अधिक बळकट करणे, हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी उत्पादक संस्थांच्या 140 हून अधिक प्रतिनिधींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. सहभागींना संबोधित करताना, आरबीआय, नागपूरचे प्रादेशिक संचालक सचिन वाय. शेंडे यांनी शेतकऱ्यांची घासाघीस करण्याची क्षमता सुधारण्यात आणि बाजारपेठेशी उत्तम संपर्क वाढवण्यात एफपीओंची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाच्या मुख्य महाव्यवस्थापक रश्मी दराड यांनी सामूहिक शेती उपक्रमांचे महत्त्व आणि या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक संस्थांना बळकट आणि सक्षम करण्यासाठी नाबार्डकडून सातत्याने मिळत असलेले पाठबळ, यावर भर दिला.
या कार्यशाळेत आरबीआय, नाबार्ड आणि इतर भागीदार संस्थांमधील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृषी आणि ग्रामीण उद्योग विकास, मूल्य साखळी एकीकरण, बाजारपेठेतील संधी, एफपीओ-एमएसएमई भागीदारी आणि उदयोन्मुख कृषी पद्धती या विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागींना डिजिटल विपणन, निर्यात आणि उत्पादकता, तसेच उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शेती पद्धतींविषयी व्यावहारिक ज्ञानही मिळाले.

या कार्यशाळेत, डिजिटल फसवणूक रोखणे, सामाजिक सुरक्षा योजना आणि आरबीआयची एकात्मिक लोकपाल योजना याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर केंद्रित असलेले विशेष आर्थिक साक्षरता सत्र आयोजित करण्यात आले होते. सहभागींना त्यांच्या संस्था बळकट करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी मोलाचे ज्ञान देणाऱ्या परस्परसंवादी चर्चा आणि मार्गदर्शनपर सत्रांनी या कार्यक्रमाची सांगता झाली.
पीआयबी नागपूर | सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272121)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English