रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते मडगाव–कारवार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा


नव्या रेल्वे सेवेमुळे गोवा–कर्नाटक संपर्काला चालना; प्रवासी सुविधा आणि प्रादेशिक विकासाला मिळणार बळ

Posted On: 11 JUN 2026 8:46PM by PIB Mumbai

मडगाव/गोवा , 11 जून 2026

 

केंद्रीय रेल्वे आणि जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी आज मडगाव रेल्वे स्थानकावरून मडगाव-कारवार एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या नव्या रेल्वे सेवेच्या प्रारंभामुळे गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी जिल्ह्यांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

ही नवी रेल्वे सेवा प्रवासी, विद्यार्थी, पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांसाठी सोयीस्कर, किफायतशीर आणि कार्यक्षम प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणार असून, यामुळे पर्यटन, व्यापार आणि या संपूर्ण प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेने दळणवळण सुविधा वाढविणे आणि प्रवाशांचा प्रवासानुभव अधिक समृद्ध करणे या उद्देशाने अभूतपूर्व आधुनिकीकरण आणि विस्ताराचा टप्पा गाठला  असल्याचे व्ही. सोमन्ना यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. 

मडगाव-कारवार एक्स्प्रेसची सुरुवात ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याबरोबरच प्रादेशिक दळणवळण अधिक बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित असलेले गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी नव्या रेल्वे सेवेच्या सुरुवातीचे स्वागत केले आणि गोवा तसेच कर्नाटकातील शेजारील जिल्ह्यांतील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.

ही सेवा दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल तसेच आर्थिक विकासाला चालना देऊन दोन्ही प्रदेशांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करेल, असे त्यांनी सांगितले.

गोवा-कर्नाटक सीमावर्ती भागातील पर्यटन, व्यापार आणि रोजगारनिर्मितीला अधिक गती मिळून दोन्ही राज्यांतील नागरिकांना या सुधारित रेल्वे संपर्काचा लाभ होईल, असेही दिगंबर कामत यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमाला संचालक राजीवकुमार मिश्रा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशा शेट्टी, वरिष्ठ रेल्वे अधिकारी, लोकप्रतिनिधी, रेल्वे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनीही या उद्घाटन सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.

मडगाव-कारवार एक्स्प्रेसमुळे कोकण पट्ट्यात अखंड आणि सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होणार असून, आधुनिक, कार्यक्षम आणि प्रवासीकेंद्रित भारतीय रेल्वेच्या ध्येयपूर्तीत या सेवेचे महत्त्वपूर्ण योगदान राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2271889) अभ्यागत कक्ष : 1145
Read this releasein: English