अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस) तर्फे जीस्टॅट अपील प्रक्रियांवर वेबिनारचे आयोजन


डीजीटीएस आणि जीस्टॅट अहमदाबाद कडून करदात्यांना अपील, पूर्व-ठेव आणि न्यायालयीन शुल्क अनुपालनाबाबत मार्गदर्शन

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2026 9:11PM by PIB Mumbai

मुंबई, 10 जून 2026

 

करदाता शिक्षण, जागरूकता आणि भागधारकांचा सहभाग यांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस), मुंबई क्षेत्र विभाग (एमझेडयू) आणि अहमदाबाद क्षेत्र विभाग (एझेडयू) यांनी, वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (जीएसटीएएस - जीस्टॅट), अहमदाबाद खंडपीठ यांच्या सहकार्याने, आज दूरदृश्य माध्यमातून “अपील दस्तऐवजांची छाननी, पूर्व-ठेवींची गणना व भरणा आणि न्यायालयीन शुल्क” या विषयावर वेबिनार घेतले.

या वेबिनारमध्ये देशभरातील करदाते, व्यापार संघटना, कर व्यावसायिक, वकील, सनदी लेखापाल, मूल्य लेखापाल, कंपनी सचिव, विभागीय अधिकारी आणि इतर भागधारक उत्साहाने सहभागी झाले. जीस्टॅटसमोर अपील दाखल करण्यासाठी आवश्यक प्रक्रियात्मक बाबींविषयी जागरूकता वाढविणे आणि नव्याने कार्यान्वित झालेल्या जीएसटी अपीलीय यंत्रणेबाबत समज वाढविण्यास सहाय्य करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डीजीटीएस एमझेडयू व एझेडयूचे प्रधान अतिरिक्त महासंचालक, सुमित कुमार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, डीजीटीएसची ‘केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळा’चा करदाता संपर्क आणि जनजागृती विभाग म्हणून भूमिका अधोरेखित केली. त्यांनी जीएसटीच्या चौकटीत वादांच्या निराकरणाबाबत कार्यक्षमता आणण्यासाठी भागधारकांमधील जागरूकता आणि प्रक्रियात्मक अनुपालनाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच, वेबिनारच्या आयोजनासाठी जीस्टॅट अहमदाबाद खंडपीठाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

जीस्टॅट अहमदाबादचे संयुक्त निबंधक विवेक कुमार आणि सहाय्यक निबंधक अजय सुहाग यांनी वेबिनारमध्ये सत्रे घेतली. वक्त्यांनी अपील दस्तऐवजांची छाननी, जीस्टॅटसमोर अपील दाखल करण्यासाठी आवश्यक प्रक्रियात्मक अटी, अपील कागदपत्रांच्या तपासणीत आढळणाऱ्या सामान्य त्रुटी आणि संपूर्ण व त्रुटीमुक्त दस्तऐवजीकरण निश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, जीएसटी अपीलीय चौकटीतील अनिवार्य पूर्व-ठेव आणि न्यायालयीन शुल्काची गणना व भरणा यासंबंधी तरतुदीही त्यांनी स्पष्ट करून सांगितल्या.

जीस्टॅट अपीलांशी संबंधित विविध व्यावहारिक आणि प्रक्रियात्मक मुद्द्यांवर स्पष्टीकरणे मिळविण्याची संधी सहभागींना प्रश्नोत्तर सत्रामुळे मिळाली.

डीजीटीएसने जीस्टॅट अहमदाबाद खंडपीठ, तज्ज्ञ वक्ते आणि सर्व सहभागींच्या मौल्यवान योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. तसेच, स्वेच्छेने अनुपालनाला प्रोत्साहन देणे, करदात्यांमध्ये जागरूकता वाढविणे आणि अप्रत्यक्ष कर कायदे व प्रक्रियांची अधिक चांगली समज निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे जनसंपर्क आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याप्रती आपली वचनबद्धता महासंचालनालयाने पुन्हा अधोरेखित केली.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271384) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English