श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विडी, चित्रपट आणि खाण उद्योगातील कामगारांच्या मुलांना शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शैक्षणिक शिष्यवृत्तीकरिता अर्ज पाठविण्याचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2026 8:10PM by PIB Mumbai

नागपूर, 10 जून 2026

 

केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अधीन असलेल्या 'कल्याण आयुक्त कार्यालया'च्या वतीने, 2026–27 या शैक्षणिक वर्षाकरिता विडी, चित्रपट आणि खाण या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या (यामध्ये चुनखडी, डोलोमाइट, मँगनीज खनिजे, क्रोम आणि लोहखनिज खाणींमधील कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे) मुलांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीकरिता ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत, उच्च तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच इयत्ता पहिलीपासूनच्या पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध आहे. शिष्यवृत्ती म्हणून दिली जाणारी रक्कम अभ्यासक्रमाची इयत्ता किंवा प्रकार यानुसार प्रतिवर्ष ₹1,000 ते ₹25,000 या दरम्यान असते. यामध्ये इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना ₹1,000, इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना ₹1,500, इयत्ता 9 वी आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांना ₹2,000, इयत्ता 11 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना ₹3,000, आयटीआय /पॉलिटेक्निक/पदवी अभ्यासक्रम (बी.एस्सी. ॲग्रीकल्चरसह) करणाऱ्यांना ₹6,000 तर बी.ई., एम.बी.बी.एस. आणि एम.बी.ए. यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹25,000 शिष्यवृत्ती दिली जाते.

या शिष्यवृत्तीसाठी scholarships.gov.in या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (एनएसपी) द्वारे अर्ज सादर करता येऊ शकतील. शिष्यवृत्तीची रक्कम 'थेट लाभ हस्तांतरण' (डीबीटी) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे, तर इयत्ता दहावी पश्चात शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज सादर करता येतील.

अर्जदारांनी आपले अर्ज सादर करण्यापूर्वी 'नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल'वर 'वन टाइम रजिस्ट्रेशन' (ओटीआर) करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना पोर्टलवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी, अर्जदारांना कल्याण आयुक्त कार्यालय, नागपूर यांच्याशी 0712-2510200 / 2510474 या क्रमांकावर किंवा wcngp-labour[at]nic[dot]in या ईमेलवर संपर्क साधता येईल.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2271377) आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English