कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्थेचा 66 वा स्थापना दिन साजरा; शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर भर

प्रविष्टि तिथि: 07 JUN 2026 12:31PM by PIB Mumbai


मुंबई इथे भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण संस्थेचा 66 वा वर्धापन दिन शनिवार, 6 जून 2026 रोजी यारी रोड येथील परिसरात साजरा करण्यात आला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी मुंबई येथील आयसीएआर-सीआयएफई चे संचालक डॉ. एन. पी. साहू हे होते.

डॉ. एन. पी. साहू यांनी आपल्या स्वागतपर भाषणात, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील संस्थेच्या देदीप्यमान कामगिरीचा आणि योगदानाचा आढावा घेतला. शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि जलसंगोपन विकासासाठी संस्थेने विकसित केलेले तंत्रज्ञान, सध्या सुरू असलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प, वैज्ञानिक प्रकाशने तसेच संस्थेच्या नावावर असलेले पेटंट्स, ट्रेडमार्क्स आणि कॉपीराईट्स याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. यासोबतच संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रांत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला.
संस्थेने अलीकडच्या काळात केलेली प्रगती, तसेच राबविण्यात येणारे लोककल्याणकारी उपक्रम यांची माहिती देणाऱ्या विविध पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच, उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना 'इन्स्टिट्यूट आणि स्पोर्ट्स' पुरस्काराने गौरविण्यात आले.
दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक संशोधन आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय व जलसंगोपन क्षेत्राला बळकटी देण्यामध्ये 'आयसीएआर-सीआयएफई'ने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे जिल्हाधिकारी कटियार यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावणाऱ्या अशा संशोधन संस्थांना पाठबळ देणे ही जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
भविष्यात संशोधन, शिक्षण क्षेत्र, खासगी उद्योग, नाविन्यपूर्ण व्यावसायिक उपक्रम किंवा व्यापार, यापैकी विद्यार्थी जे निवडतील त्या क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. व्यावसायिक यशापलीकडे जाऊन समाजाच्या आणि देशाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असणारा एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक बनणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, यावर कटियार यांनी विशेष भर दिला.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. यानंतर 'आयसीएआर-सीआयएफई'चे प्रभारी संयुक्त संचालक डॉ. के. एन. मोहंता यांनी संस्थेच्या भविष्यातील योजना, विकासात्मक उपक्रम आणि धोरणात्मक प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडणारा आगामी वर्षाचा कृती आराखडा सादर केला.
या सोहळ्यानंतर आयोजित माजी विद्यार्थी मेळावा, स्नेहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी माजी विद्यार्थी, सध्याचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी परस्परांशी संवाद साधत, संस्थेच्या समृद्ध परंपरेचा गौरव केला.

***

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269975) आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English