Posted On:
05 JUN 2026 10:13PM by PIB Mumbai
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने, अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला असून, अंदाजे 2.61 कोटी रुपये किमतीचा 522.554 किलो गांजा जप्त केला आहे. या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने सखोल पाळत ठेवून केलेल्या एका कारवाईत, ओडिशा-मध्य भारत कॉरिडॉरमध्ये कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्राला प्रतिबंधित वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन व्यक्तींना अटक केली.
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मौदाजवळील मथनी टोल प्लाझा येथे, राष्ट्रीय महामार्ग-53 वर ओडिशा-आंध्र प्रदेश सीमेकडून महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मोटर्सच्या 16-टन वजनाच्या लाँग प्लॅटफॉर्म ट्रकला (एलपीटी 1618) अडवले. त्यानंतर त्या वाहनाची झडती घेतली असता, खाकी रंगाच्या प्लास्टिक टेपने स्वतंत्रपणे गुंडाळलेली, 522.554 किलो वजनाची गांजाची 247 पाकिटे असलेल्या आठ एचडीपीई पिशव्या जप्त करण्यात आल्या.
हे प्रतिबंधित अंमली पदार्थ ड्रायव्हरच्या सीटमागे खास तयार केलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये, ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या सीटच्या वरील पोकळीत, ट्रकच्या कार्गो एरियाखालील एका कुलूपबंद टूलबॉक्समध्ये आणि ड्रायव्हरच्या केबिनच्या वर लपवलेले आढळले . अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत 2.61 कोटी रुपये आहे. यासह 8.5 लाख रुपये किमतीचे वाहन देखील जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
याआधी या वर्षाच्या सुरुवातीला दोन वेगवेगळ्या मात्र एकमेकांशी निगडित असलेल्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाने 6.25 कोटी रुपये किंमतीचा 1,250 किलो गांजा जप्त केला होता. तसेच या तस्करीच्या रॅकेटमधल्या सूत्रधारासह चार जणांना अटक केली होती.
राज्यांच्या सीमा भागातून होणाऱ्या संघटीत अमली पदार्थ तस्करीविरोधात डीआरआयने लागोपाठ केलेल्या कारवाईतून डीआरआयची अमली पदार्थ विरोधातील कारवाईची नियमित अंमलबजावणी दिसून येते. नशा मुक्त भारत या केंद्र सरकारच्या अभियानातील डीआरआयचा सहभाग आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधातील लढ्याचा दृढ निर्धार या यशस्वी कारवाईमधून प्रत्ययाला येतो.
अंमली पदार्थांशी संबंधित कोणत्याही घटनांविषयीची माहिती नागरिकांनी त्वरित द्यावी असे आवाहन महसूल गुप्तचर संचालनालयाने केले आहे. अशा प्रकारची माहिती अत्यंत गोपनीय राखली जाईल तसेच त्यामुळे सार्वजनिक आरोग्य अधिक सुरक्षित करता येईल आणि अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध सुरु असलेल्या प्रयत्नांना पाठबळ मिळेल.
***
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai