विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा; पर्यावरण देखरेख आणि सार्वजनिक आरोग्यावर दिला भर

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2026 9:10PM by PIB Mumbai

नागपूर, 5 जून 2026

 

सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे आज 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा करण्यात आला. टाटा इन्स्टिट्यूट फॉर जेनेटिक्स अँड सोसायटी, बेंगळुरूचे संचालक आणि सीएसआयआर-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबादचे माजी संचालक डॉ. राकेश मिश्रा हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन आणि शास्त्रज्ञ प्रकाश कुंभारे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

‘पर्यावरणीय देखरेख आणि एक आरोग्य’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. मिश्रा यांनी रोगजनक, प्रतिजैविक प्रतिरोध आणि परिसंस्थेच्या स्वास्थ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मेटाजेनोमिक्स आणि पर्यावरणीय देखरेखीची भूमिका अधोरेखित केली. कोविड-19 महामारीच्या काळातील पर्यावरणीय निगराणीमुळे संसर्गाचे कल आणि विषाणूंचे प्रकार लवकर ओळखणे शक्य झाले आणि वेळेवर सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना करण्यास मदत झाली, याचा उल्लेख डॉ. मिश्रा यांनी केला.

प्रतिजैविक प्रतिरोध (एएमआर) हे एक जागतिक आव्हान आहे आणि सांडपाणी, हवा व इतर पर्यावरणीय घटकांमधून रोगजनकांवर देखरेख ठेवण्यासाठी अलायन्स फॉर पॅथोजेन सर्व्हिलन्स इनोव्हेशन्स आणि नॅशनल वन हेल्थ मिशन यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांकडे त्यांनी लक्ष वेधले. 'वन हेल्थ' या दृष्टिकोनावर भर देत ते म्हणाले, की मनुष्य, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य यांचे एकमेकांशी घनिष्ठ नाते आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी समन्वित कृतीची आवश्यकता आहे.

लवचिक देखरेख प्रणाली तयार करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सज्जता बळकट करण्यासाठी वैज्ञानिक संस्था, सरकारी संस्था आणि समुदाय यांच्यातील सहकार्याच्या महत्त्वावर डॉ. मिश्रा यांनी भर  दिला.

हवा आणि पाणी गुणवत्ता व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, कचरा मूल्यवर्धन आणि पर्यावरण पुनर्संचयन या क्षेत्रांतील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या योगदानावर डॉ. एस. व्यंकट मोहन यांनी स्वागतपर भाषणात भाष्य केले आणि शाश्वत पर्यावरणीय उपायांसाठी संस्थेची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.

या प्रसंगी, सहयोगी संशोधन आणि नवोन्मेष अधिक सक्षम करण्यासाठी सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टीआयजीएस यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ‘भारतीय संदर्भातील औद्योगिक परिसंस्था’ आणि ‘विदर्भ प्रदेशासाठी पर्यावरणीय आरोग्य जोखीम समस्या आणि कृती आराखडा’ या दोन श्वेतपत्रिकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरमधील बुरशीजन्य विविधता’ या पुस्तकाचेही अनावरण याप्रसंगी करण्यात आले. विद्यार्थी संशोधन आणि नवोपक्रम प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि विज्ञान प्रतिकृतींसाठी उत्कृष्टता  प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2269565) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English