दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र टपाल परिमंडळाकडून ' ढाई आखर' (Dhai Akhar) स्पर्धा आणि 'स्पर्श' शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून प्रतिभेचा गौरव


राष्ट्रीय पातळीवरील 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धेत 1.83 लाखांपेक्षा जास्त स्पर्धक झाले सहभागी, महाराष्ट्र टपाल परिमंडळाने यातील विजेत्यांचा केला सन्मान

प्रविष्टि तिथि: 04 JUN 2026 5:48PM by PIB Mumbai

मुंबई, 4 जून 2026

 

महाराष्ट्र टपाल परिमंडळाने राष्ट्रीय पातळीवरील 'ढाई आखर' पत्रलेखन स्पर्धा  2025–26 आणि 'दीनदयाळ स्पर्श योजना' टपाल संग्राहक शिष्यवृत्ती योजना 2025–26 चा पुरस्कार वितरण सोहळा 3 जून 2026 रोजी मुंबई जीपीओ येथे आयोजित केला. महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल  अमिताभ सिंग यांनी, कव्हरशुअर (CoverSure) चे संस्थापक आणि सीईओ  सौरभ विजयवर्गीय; महाराष्ट्र परिमंडळाच्या महाव्यवस्थापक (वित्त)  जयती  समद्दार आणि मुंबई जीपीओच्या संचालक  रेखा रिझवी यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात कव्हरशुअरचे संस्थापक आणि सीईओ सौरभ विजयवर्गीय यांनी "चिठ्ठी आयी है" नावाच्या इनलँड लेटर कार्ड (ILC) मोहिमेची ओळखही करून दिली.

मुंबई जीपीओ येथे वेगवेगळ्या पिढ्यांतील लोकांना एकाच छताखाली एकत्र आलेले पाहणे हा एक बहुमान होता, असे मेळाव्याला संबोधित करताना अमिताभ सिंग यांनी सांगितले. त्यांनी दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांनी दाखवलेली सर्जनशीलता, कल्पकता आणि प्रतिभेचे कौतुक केले.

पत्रलेखनाच्या माध्यमातून पिढ्यांना जोडणारी टपाल विभागाची अनोखी भूमिका त्यांनी अधोरेखित केली. डिजिटल युगात जरी पारंपरिक पत्रव्यवहार कमी झाला असला, तरी टपाल कार्यालय आपल्या पार्सल सेवांच्या माध्यमातून आणि घरोघरी तसेच ई-कॉमर्स कंपन्यांशी असलेल्या दृढ संबंधांमुळे नागरिकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून राहिले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सिंग यांनी "चिठ्ठी आयी है" उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याच्या सामाजिक महत्त्वाचे कौतुक केले. हा उपक्रम मुंबई जीपीओच्या माध्यमातून विमा-संबंधित माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इनलँड लेटर कार्ड्सचा (ILC) वापर करत असल्याने पारंपरिक टपाल दळणवळणाचे महत्त्व एका अर्थपूर्ण मार्गाने पुनरुज्जीवित होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

ढाई आखर पत्रलेखन स्पर्धा 2025–26

'ढाई आखर' स्पर्धा हा टपाल विभागाचा  एक राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम असून सर्जनशीलता, अस्सलपणा आणि स्वयं-अभिव्यक्तीला  प्रोत्साहन देणे, तसेच तरुण पिढीला टपाल सेवा आणि टपाल सामग्री संग्रहाच्या उपक्रमाकडे पुन्हा वळवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

“माझ्या आदर्श व्यक्तीला पत्र” या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा 8 सप्टेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील स्पर्धकांसाठी आंतरदेशीय पत्र आणि लिफाफा या दोन्ही स्वरूपांचा समावेश असलेल्या चार गटात इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत पत्र लिहिण्यासाठी सहभागींना आमंत्रित करण्यात आले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रातून तब्बल 1,83,049 स्पर्धकांनी भाग घेतला. प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट तीन अशा एकूण 12 विभागीय विजेत्यांची निवड करून त्यांची प्रवेशिका राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनासाठी पाठवण्यात आली.

परिमंडळ  स्तरावर स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 25,000 रुपये, 10,000 रुपये आणि 5,000 रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. तर, राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना अनुक्रमे 50,000 रुपये 25,000 रुपये आणि 10,000 रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

दीन दयाळ स्पर्श योजना 2025-26

दीन दयाळ स्पर्श योजना हा टपाल विभागाने 2017-18 मध्ये सुरू केलेला एक देशव्यापी शिष्यवृत्ती कार्यक्रम आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकीट संग्रहाला प्रोत्साहन देणे तसेच टपाल तिकीट संग्रहाद्वारे शिक्षणाला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

2025-26 या वर्षासाठी, ही योजना मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता सहावी ते नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

या योजनेअंतर्गत आयोजित टपाल तिकीट संग्रह प्रश्नमंजुषेमध्ये एकूण 3,570 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. मूल्यांकनानंतर, प्रकल्प सादर करण्यासाठी 215 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, 2025-26 या वर्षासाठी इयत्ता सहावी, सातवी, आठवी आणि नववीमधून प्रत्येकी 10 असे एकूण 40 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक म्हणून निवडले गेले.

स्पर्धेचा अंतिम निकाल 1 डिसेंबर 2025 रोजी इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे पत्रलेखन आणि टपाल तिकीट संग्रह या उपक्रमाचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित करत तरुण पिढीमध्ये सर्जनशीलता, शिक्षणाची आवड आणि अर्थपूर्ण सहभागाला प्रोत्साहन देण्यात आले.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2268975) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English