संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनडीएचे ऐतिहासिक 150 वे दीक्षांत संचलन; 353 कॅडेट्सनी खेत्रपाल संचलन मैदानावर पार केला 'अंतिम पग'


खडकवासला इथे सुखोई-30 फ्लायपास्टने एनडीएच्या 150 व्या दीक्षांत संचलनाची झाली सांगता

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्प्रिंग टर्म 2026 संचलनाची केली पाहणी; 353 पदवीधरांमध्ये 18 महिला कॅडेट्सचा समावेश

Posted On: 30 MAY 2026 4:23PM by PIB Mumbai

पुणे, 30 मे 2026

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एन डी ए) 150 व्या अभ्यासक्रम वर्षाचे  प्रशिक्षण, 30 मे 2026 च्या सकाळी ऐतिहासिक खेत्रपाल संचलन मैदानावर आयोजित दीक्षांत संचलनासह पूर्ण झाले. विलक्षण अचूकतेसह, शिस्तबद्ध आणि डौलदार प्रदर्शन करत पदवीधर प्रशिक्षणार्थींनी (कॅडेट्स) क्वार्टरडेक (संचलन मार्ग) वरून संचलन केले. त्यांच्या या प्रभावी संचलनाने उपस्थित प्रेक्षकांमध्ये अभिमान आणि कौतुकाची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमाला, अभिमानाने आपल्या पाल्यांचा गौरव पाहणारे पालक, मान्यवर पाहुणे, शाळकरी विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक तसेच संरक्षण दलातील कार्यरत आणि निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी, असा विविध घटकांतील जनसमुदाय उत्साहाने उपस्थित होता.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, परम विशिष्ट सेवा पदक- पीव्हीएसएम, अति विशिष्ट सेवा पदक-एव्हीएसएम, हे स्प्रिंग टर्म-2026 (वसंतकालीन सत्र 2026) या दीक्षांत संचलनाचे प्रमुख निरीक्षक होते. हे संचलन, अकादमीचे ॲडज्युटंट लेफ्टनंट कर्नल अविनाश पांडे, सेना पदक-एस एम यांनी त्यांच्या 'रिलायंट रॉबिन' या घोड्यावर स्वार होऊन संचालित केले. तर संचलनाचे नेतृत्व लिमा स्क्वॉड्रनचे अकादमी कॅडेट कॅप्टन मयांक चौधरी यांनी केले.

18 महिला कॅडेट्स आणि 12 मित्र देशांमधील 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्सनी 'Auld Lang Syne' च्या धूनवर खांद्याला खांदा लावून चालत 'अंतिम पग' पार केला. यशस्वी पदवीदानानंतर हे कॅडेट्स आता 'एनडीए'चे माजी विद्यार्थी म्हणून आपापल्या सेवापूर्व प्रशिक्षण अकादमींमध्ये (पीसीटीएज्) आणि संबंधित सेवा दलांमध्ये दाखल होतील. हा टप्पा, प्रबोधिनीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण परिवर्तनबिंदू ठरत असून, उत्कृष्टता, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रनिर्मितीप्रती तिची अखंड बांधिलकी अधिक दृढ करणारा आहे.

मुख्य निरीक्षकांच्या हस्ते सर्वांगीण गुणवत्तेच्या क्रमवारीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या कॅडेट्सना राष्ट्रपती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी गौरविण्यात आले.

सुखोई-30 लढाऊ विमानांच्या थरारक हवाई प्रात्याक्षिकांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266982) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English