माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे जागतिक सुलभता जागरूकता दिनानिमित्त 'एन.एफ.डी.सी.' कडून 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या कलाकारांचा सन्मान

Posted On: 30 MAY 2026 1:20PM by PIB Mumbai

मुंबई, 30 मे 2026

 

खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक चित्रपट परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एन.एफ.डी.सी.) शुक्रवार (May 29, 2026) रोजी राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय (एन.एम.आय.सी.), मुंबई येथे क्रीडवर आधारित विनोदी आणि भावनिक 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे खास प्रदर्शन आयोजित केले आणि त्यानंतर त्या विषयावर तज्ञांची हृदयस्पर्शी चर्चा घडवून आणली. जागतिक सुलभता जागरूकता दिनानिमित्त आयोजित या परिसंवादात चित्रपटातील पाच अनोख्या तरुण कलाकारांवर विशेष प्रकाश टाकण्यात आला. पारंपरिक प्रश्नोत्तरांच्या स्वरूपापलीकडे जात, हे सत्र "मने जोडणारा संवाद" म्हणून पार पडले. या परिसंवादाचा विषय ‘बियॉन्ड लेबल्स : अवर ड्रीम्स, अवर स्टोरीज' (ठराविक शिक्क्यांच्या पलीकडे: आपली स्वप्ने, आपल्या गोष्टी) असा होता.

गौरी नायर यांच्या नेतृत्वाखालील ‘डिपार्टमेंट ऑफ मास्टरक्लासेस अँड पॅनेल सेशन्स’ या विशेष मार्गदर्शन सत्रे आणि तज्ज्ञ परिसंवाद विभागा द्वारे आयोजित या सत्राची सुरुवात एन.एफ.डी.सी च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील 50 वर्षांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या एका चित्रफितीने झाली. "झितारेज् फ्रॉम मुंबई” म्हणून ओळख करून देण्यात आलेल्या या तरुण कलाकारांमध्ये - आरुष दत्त (सतबीर), एक उत्कृष्ट अभिनेता आणि प्रेरक प्रभावी व्यक्तिमत्त्व ज्याने नुकतेच सामुदायिक समावेशकतेवर एक प्रभावी टेडएक्स भाषण दिले आहे; वेदांत शर्मा (बंटू), योग, नृत्य, आचारी, पोहणे असा बहुआयामी वावर असणारा आणि नुकताच ‘इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ कडून 'रायझिंग इन्फ्लुएन्सर' म्हणून गौरवण्यात आलेला पदवीधर; संवित देसाई (करीम कुरेशी), एक पुरस्कार प्राप्त ओपन माइक सूत्रसंचालक आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी ओळखला जाणारा जागतिक स्तरावरील गुणी कलाकार; सिमरन मंगेशकर (गोलू खान), या चमूतील प्रमुख महिला कलाकार, जिची मुख्य प्रवाहातील बॉलिवूडमधील पहिली दिव्यांग महिला अभिनेत्री म्हणून ‘इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे आणि जिने पहिल्या इन्का अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे; आणि आयुष भन्साळी (लोटस), एक प्रशिक्षित कथ्थक आणि टॅप नर्तक, संगीतप्रेमी आणि प्राणिमित्र, ज्याने 'बेस्ट परफॉर्मन्स इन अन एन्सेंबल' आणि 'करेज इन सिनेमा अवॉर्ड' जिंकून सर्वांची मने जिंकली…. यांचा समावेश होता. कर्करोगावर मात करणारे आणि दिव्यांगांच्या ऑलिंपिक स्पर्धेतील पदक विजेते ऋषी शहानी यांनी देखील प्रेक्षकांशी संवाद साधण्याची तळमळ जपत चित्रफितीद्वारे पाठवलेला हृदयस्पर्शी संदेश, या कार्यक्रमात दाखवण्यात आला.

एन.एफ.डी.सी चे महाव्यवस्थापक (जी.एम) डी रामकृष्णन, या तरुण उत्सवमूर्तींचा औपचारिक सत्कार करण्यासाठी मंचावर उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी या कलाकारांनी मुख्य प्रवाहातील मनोरंजन विश्वातील विविध अडथळ्यांवर मात करून निर्माण केलेल्या प्रभावाचे आणि योगदानाचे विशेष कौतुक केले. त्यानंतर प्रेक्षकांना या कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी देण्यात आली. या संवादात त्यांनी चित्रिकरणादरम्यानचे मजेदार अनुभव, त्यांच्या आवडी-निवडी, विचार, काम करताना आलेली आव्हाने आणि खऱ्या अर्थाने समावेशकतेविषयीची त्यांची भूमिका याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रत्येक वक्त्याने आपले वैयक्तिक अनुभव आणि विचार मांडले. त्यांच्या जिद्दीने, चिकाटीने आणि कलात्मक कौशल्याने उपस्थित प्रेक्षकांना प्रेरणा मिळाली. "आजच्या संवादाचे खरे फलित म्हणजे समावेशकता आणि सकारात्मक परिवर्तनाच्या प्रवासात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे, याची जाणीव. बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार आपलाच असला पाहिजे; कारण आपणच त्या परिवर्तनाचे शिल्पकार आहोत, आपणच तो बदल आहोत."

कार्यक्रमाचा प्रभावी समारोप करताना 'एन.एफ.डी.सी.' ने या कलाकारांच्या यशामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. या कलाकारांच्या आयुष्यातील खरे आधारस्तंभ असलेल्या कुटुंबीयांच्या निःस्वार्थ प्रेम, अथक पाठबळ आणि अढळ विश्वासाचा आदर करत 'एन.एफ.डी.सी. 'ने सिमरन, संवित, आरुष, वेदांत आणि आयुष यांच्या पालकांचा विशेष सत्कार केला. या परिसंवादानंतर शुक्रवारी संध्याकाळी 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचा विशेष खेळ दाखवण्यात आला.

 

* * *

पीआयबी मुंबई | यश राणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2266933) अभ्यागत कक्ष : 33
Read this releasein: English