अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीजीटीएस, मुंबई विभागीय शाखा आणि आयसीएसआय यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटीएटी पीठाची संरचना आणि कार्यपद्धतीवर वेबिनारचे आयोजन

Posted On: 29 MAY 2026 8:00PM by PIB Mumbai

मुंबई, 29 मे 2026

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचा, (सीबीआयसी) करदात्यांशी संवाद साधणारा एक समर्पित विभाग असलेल्या करदाता सेवा महासंचालनालयाच्या (डीजीटीएस)  मुंबई विभागीय शाखेने इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) सहकार्याने  दिनांक 29 मे 2026 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नवीन जीएसटीएटी पीठाची संरचना, प्रकरणांचे वर्गीकरण आणि पीठांची कार्यपद्धती समजून घेणे, या विषयावर एका वेबिनारचे आयोजन केले.

या वेबिनारमध्ये देशभरातील व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सदस्य, कर व्यावसायिक, कंपनी सचिव , सनदी लेखापाल , विभागीय अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ अशा सुमारे 600 भागधारकांनी आपला  सहभाग नोंदवला. परिवर्तन होत असलेल्या जीएसटी अपील प्रणालीबाबत जागरूकता वाढवून जीएसटी अंतर्गत विवाद निवारण करणाऱ्या यंत्रणांविषयी करदात्यांमध्ये जनजागृती करणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.

आपल्या प्रास्वाविकात डीजीटीएस मुंबई विभाग शाखेचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी कर कायद्यांमधील आणि कार्यपद्धतींमधील बदल भागधारकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. व्यावसायिक आणि करदात्यांसाठी ज्ञानवर्धक कार्यक्रमांचे आयोजन करण्यामध्ये आयसीएसआय बरोबर केलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले.

या वेबिनारला डब्लूआयआरसी – आयसीएसआय चे अध्यक्ष सीएस योगेश चौधरी आणि आयसीएसआयच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य सीएस प्रवीण सोनी यांची विशेष उपस्थिती लाभली; त्यांनी नवीन जीएसटी  अपील रचना समजून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.

या वेबिनारमधील तांत्रिक सत्रे जीएसटीएटी, राजकोट येथील सन्माननीय सदस्य (विधी) प्रमोद कुमार राय आणि सीजीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई विभागाचे उपायुक्त दीपक माता यांनी घेतली. या सत्रांमध्ये जीएसटीएटी खंडपीठांची रचना व कार्यपद्धती, प्रकरणांचे वर्गीकरण, प्रक्रियात्मक बाबी आणि जीएसटी  अपीलांमध्ये आढळून येणाऱ्या सामान्य त्रुटी या विषयांचा समावेश होता.

सत्रांच्या शेवटी आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्राद्वारे, सहभागींना जीएसटी  अपील प्रक्रियेसंबंधित व्यावहारिक आणि कायदेशीर मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण मिळवणे शक्य झाले.

आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान, डीजीटीएस, मुंबई शाखेने  एकूण 62 संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले, यामध्ये जीएसटी संबंधित 40 कार्यक्रमांचा समावेश होता. या माध्यमातून त्यांनी करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या आणि भागधारकांशी सक्रिय संवाद साधण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.


सुषमा काणे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2266859) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English