ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
बीआयएस मुंबईने आयोजित केली फर्निचर मानके आणि सुधारणांवर आधारित परिषद अर्थात मानक मंथन
Posted On:
27 MAY 2026 10:49PM by PIB Mumbai
मुंबई, 27 मे 2026
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या मुंबई शाखा कार्यालयाने, फर्निचर मानकांमधील नव्या सुधारणा, तांत्रिक तरतुदी आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी, 26 मे 2026 रोजी बीआयएसच्या मुंबईतील पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेत परिषद अर्थात मानक मंथनचे प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने आयोजन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेचे प्रमुख अनिल कापरी यांच्या प्रास्ताविकाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी फर्निचर उत्पादन क्षेत्राला मजबूत करण्यासाठी गुणवत्तेच्या मानकानुसार गुणवत्तेच्या निकषांचे पालन करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
या कार्यक्रमातील तांत्रिक सत्र बीआयएसचे वैज्ञानिक (एससी-सी) आणि उपसंचालक आनंद भट्ट यांनी संचलित केले. त्यांनी फर्निचरच्या पृष्ठभागाच्या फिनिशिंगसाठीच्या आवश्यक कामगिरी निकष मानकांच्या सुधारणा क्रमांक - 2 आणि आयएस आयएस 17637:2021, पलंगांच्या संदर्भातील निकषांच्या तपशीलामधील (सुधारणा 1:2025), सह या विषयीचे मानक आयएस 17635:2022 आणि सामान्य वापराच्या खुर्च्या व स्टूल्सच्या तपशीलाविषयीचे मानक आयएस 17632:2022 (सुधारणा 1:2025) यांसारख्या प्रमुख मानकांविषयी सविस्तर माहिती दिली.

या सत्रांमध्ये मानकांमधील अलीकडील सुधारणा, अंमलबजावणीसाठीच्या आवश्यक बाबी, उत्पादनांची नियमावली, चाचणीची प्रक्रिया आणि अनुपालनासंदर्भातील संबंधित तरतुदी या विषयांचा समावेश होता. या परिषदेत फर्निचर उत्पादक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (एमएसएमईएस), असोसिएशन ऑफ फर्निचर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडिया(एएफएमआय) व असोसिएशन ऑफ फर्निचर मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स (एएफएमटी) यांचे प्रतिनिधी, तसेच इतर संबंधित भागधारकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या परस्पर संवादी चर्चासत्रामुळे आणि प्रश्नोत्तरांच्या सत्रांमुळे सहभागींना मानकांच्या तांत्रिक आणि अंमलबजावणीशी संबंधित बाबींबद्दलच्या शंकांनिरसण करण्याची संधी मिळाली.
अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून विविध उद्योगांमध्ये गुणवत्ता निकषांविषयीची दक्षता आणि मानकीकरणाचा प्रसार करण्यात बीआयएस मुंबई सातत्याने पुढाकार घेत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | हर्षल आकुडे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2266141)
अभ्यागत कक्ष : 10